एकामागोमाग एक कलाकार मंडळी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली देत विवाहबंधनात अडकताना दिसत आहेत. २०२३ या वर्षात अनेक लोकप्रिय जोडींनी लगीनगाठ बांधली. तर येत्या नव्या वर्षात काही कलाकार मंडळी विवाहबंधनात अडकणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अशातच मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय जोडपं ही विवाहबंधनात अडकणार असल्याची चाहूल लागली आहे. हे लोकप्रिय कपल म्हणजे अभिनेता अजिंक्य ननावरे व अभिनेत्री शिवानी सुर्वे. (Ajinkya Nanaware And Shivani Surve)
अभिनेत्री शिवानी सुर्वे व अभिनेता अजिंक्य ननावरे ही जोडी मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवानी व अजिंक्य हे दोघे रिलेनशिपमध्ये आहेत. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आता लवकरच शिवानी व अजिंक्य लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. ही चर्चा अभिनेत्याने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोवरील कॅप्शनमुळे सुरु झाली असल्याचं कळतंय.
शिवानी व अजिंक्य पॉंडिचेरी येथे नवीन वर्ष साजरं करायला गेले आहेत. दरम्यान शिवानीने अजिंक्यसह पोस्ट केलेल्या एका फोटोने अनेकांचं लक्ष वेधलं. त्यांच्या या फोटोवरुन अनेकांनी दोघांच्या लग्नाचे अनेक अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. शिवानीने अजिंक्यबरोबर एक फोटो पोस्ट करत “तुझी गर्लफ्रेंड म्हणून आता हे शेवटचं वर्ष” असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे शिवानी व अजिंक्य लवकरच लग्न करणार का असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.

शिवानी व अजिंक्य यांची पहिली भेट २०१७ मध्ये ‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. तेव्हापासून दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत. अनेक वर्ष डेट केल्यानंतर आता ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं निश्चित झालं आहे. काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये शिवानी साड्यांची खरेदी करत असल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावरून अजिंक्य व शिवानी यांची लगीनघाई सुरु असल्याचं कळतंय.