मराठी कलाक्षेत्रात आमचं ठरलं म्हणत अनेक मराठमोळ्या कलाकारांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली. त्यानंतर एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत गेले. गेल्या वर्षात स्वानंदी-आशिष, मुग्धा-प्रथमेश, गौतमी-स्वानंद, सुरुची-पियुष, वनिता-सुमित या लोकप्रिय जोड्या विवाहबंधनात अडकल्या. ‘आमचं ठरलं’ म्हणत प्रेमाची जाहीर कबुली दिल्यानंतर या जोड्यांनी अखेर लग्नगाठ बांधली. यापाठोपाठ आता आणखी एक मराठमोळा अभिनेता बोहोल्यावर चढण्यास सज्ज होत आहे. (Prathamesh Parab Wedding)
‘आमचं ठरलं’ म्हणत थेट केळवणाचे फोटो शेअर करत प्रसिद्ध अभिनेता प्रथमेश परब लग्न करण्यास सज्ज झाला आहे. प्रथमेशने गेल्या वर्षी व्हॅलेंटाईन डे दिवशी त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती. प्रथमेश क्षितिजा घोसाळकरबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. यांनतर दोघांनी बरेच एकत्र फोटो शेअर केले. त्यानंतर थेट केळवणाचा फोटो शेअर करत प्रथमेशने लवकरच लग्न करणार असल्याची माहिती दिली.
प्रथमेशने क्षितिजा घोसाळकरबरोबर केळवणाचा फोटो शेअर केला आहे. तसेच दोघांच्या नावापासून तयार केलेला #pratija असा सुंदर हॅशटॅग पोस्टमध्ये शेअर करण्यात आला आहे. “#pratija चं ठरलंय हा! बाकी तारीख लवकरच कळवतो. (PS- तारीख खूपच Special आहे! हिंट कॅप्शनमध्येच आहे. कमेंटमध्ये गेस करा) तोवर नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. Happppppy “2024” असं प्रथमेशने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. या पोस्टबरोबर त्याने #यंदा कर्तव्य आहे, #केळवण स्टोरीज, #लग्न #साखरपुडा #तयारी_सुरू #pratija #prathameshparab #kshitijaghosalkar असे हॅशटॅगही दिले आहेत.
प्रथमेशच्या या पोस्टमधील लग्नाची तारीख कॅप्शनमध्ये दिली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे त्यांचे चाहते अनेक निष्कर्ष काढताना दिसत आहेत. प्रथमेशच्या या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींसह चाहत्यांनीही दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. प्रथमेशची ही पोस्ट पाहता त्याची लगीघाई सुरु झाल्याचंही पाहायला मिळत आहे. आता प्रथमेश व क्षितिजा केव्हा लग्नबंधनात अडकणार याकडे आता साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.