अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने आजवर मालिका, चित्रपट, नाटक या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. संकर्षणची खासियत म्हणजे सूत्रसंचालन. त्याच्या सूत्रसंचालनाचे अनेक चाहते आहेत. शिवाय संकर्षण उत्तम कविता करतो. सध्या संकर्षण नाट्यविश्वाकडे रमलेला पाहायला मिळत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो नेहमीच प्रेक्षकांच्या संपर्कात राहत असतो. सुसंस्कारी, समंजस असणारा संकर्षण लहानपणी मात्र किती खोडकर होता याचा एक किस्सा संकर्षणने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे. (Sankarshan Karhade Incident)
आजकाल कलाकार मंडळी त्यांच्या व्यक्तिगत, खासगी आयुष्यबाबत बरेचदा बोलताना दिसतात. अशातच अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या खासगी आयुष्याबाबत भाष्य करत अनेक किस्से सांगितले आहेत. संकर्षण कऱ्हाडेने सुद्धा नुकतीच ‘व्हायफळ गप्पा’ या पेजला मुलाखत दिली. त्यात त्याने त्याच्या बालपणीचा गंमतीशीर किस्सा शेअर केला.
संकर्षण कऱ्हाडेने लहानपणी चोरी पकडल्याचा एक किस्सा सांगितला आहे. यावेळी बोलताना संकर्षण म्हणाला, “माझे वडील बँकेत कामाला होते. त्यामुळे ज्या व्यक्तीचं अकाऊंट आहे त्याची संपुर्ण कुंडली त्यांना कळायची. मला एक दिवस माझ्या आजोबांनी एटीएममधून ५०० रुपये काढून आणायला सांगितले. मी एटीएममध्ये गेलो. पहिले ३०० रुपये काढले. त्यानंतर जी पावती आली ती फाडून फेकली. मग, पुन्हा ५०० रुपये काढले आणि जी पावती होती ती घेऊन घरी गेलो. आजोबांना ५०० रुपये पावतीसह दिले. आधी काढलेले ३०० रुपये माझ्या खिशात ठेवले”.
किस्सा पुढे सांगत संकर्षण म्हणाला, “बाबा जेव्हा बँकेतून घरी आले त्यावेळी त्यांनी आजोबांना विचारलं की, आज तुम्ही ८०० रुपये कशासाठी काढले? हा प्रश्न ऐकून मला ३०० रुपयांचा घाम फुटला. आजोबांनाही पटकन कळेना. पण, त्यांनी बाबांच्या होकारात होकार मिळवला आणि कामासाठी ८०० रुपये काढले असं सांगितलं. त्यानंतर बाबा आत गेल्यानंतर आजोबांनी एक शिवी हाणली आणि मला बोलावलं, आपण चोरी करताना आपला बाप बॅंकेत आहे याचं तरी भान ठेव, असं म्हणत त्यांनी माझी चांगलीच कानउघडणी केली” हा चोरी पकडल्याचा किस्सा संकर्षणने सांगितला.