अभिनेत्री सुकन्या मोने या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा या चित्रपटांमुळे चांगल्याच प्रसिद्धीझोतात आल्या आहेत. या चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे चित्रपटातील कलाकारदेखील चांगलेच लोकप्रिय झाले. अशातच नुकत्याच या चित्रपटाचा खास स्क्रीनिंग सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला त्यांची नव्वद वर्षीय आईदेखील उपस्थित राहिली होती. त्यामुळे सुकन्या मोने यांचं आनंद गगनात मावत नव्हता. सुकन्या मोने सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. त्यामुळे सुकन्या मोने व त्यांची आई या माय-लेकीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. (Sukanya Mone On Instagram)
अशातच सुकन्या मोने यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. सुकन्या मोने यांच्या लेकीने तिच्या हातावर आईच्या आठवणीत खास टॅटू काढला आहे. त्यांची लेक ज्युलियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर सुकन्या मोने यांना टॅग करत टॅटू काढतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. “आईबरोबर काढलेला शेवटचा टॅटू” असं म्हणत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तर सुकन्या मोने यांनीही या व्हिडीओखाली “आयुष्यभर लक्षात राहील अशी आठवण” असं म्हटलं आहे. दरम्यान सुकन्या यांनीही त्यांच्या हातावर अगदी लेकीसारखाच टॅटू काढला आहे. त्यांच्या या कृतीमुळे त्यांच्यातील मायलेकीचे गोड नाते दिसून येते.
आणखी वाचा – येत्या नवीन वर्षात ओटीटीवर मनोरंजनाची पर्वणी, ‘मिर्झापूर’, ‘पंचायत’सारख्या बहूचर्चित सिरीजचे नवीन सीझन येणार
मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकार जोड्यांपैकी एक लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेते संजय मोने व सुकन्या मोने. गेली अनेक वर्षे ही जोडी मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत. आजवर त्यांनी अनेक नाटक, मालिका व चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सुकन्या यांच्या करिअरचा प्रवास शाळा व महाविद्यालयापासूनच सुरु झाला.’प्रेमासाठी वाट्टेल ते’ या मराठी चित्रपटामधून त्यांनी सिनेक्षेत्रामध्ये पदार्पण केले.
सुकन्या यांनी आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘आभाळमाया’, ‘वादळवाट’, ‘कळत नकळत’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘चुक भूल द्यावी घ्यावी’, ‘जुळून येती रेशीमगाठी’ यांसारख्या अनेक दर्जेदार व लोकप्रिय मालिकांच्या त्या महत्त्वपूर्ण भाग होत्या. त्यांच्या या मालिकांमधील अभिनय आजही लोकांच्या स्मरणात आहे.