पठाणकोटच्या हल्का भोया येथील स्थानिक लोकांनी सरना बसस्थानकात ठिकठिकाणी बेपत्ता खासदार सनी देओलचे पोस्टर लावून संताप व्यक्त केला. जिल्ह्यात बेपत्ता खासदाराचे पोस्टर लावण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही जिल्ह्यातील पठाणकोट, सुजानपूर भागात बेपत्ता खासदार सनी देओलचे पोस्टर लावण्यात आले होते, मात्र खासदारांनी एकदाही लोकांच्या वेदना समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही असा आरोप तेथील जनतेने केला आहे. (Sunny Deol Missing Posters)
गावाच्या दुरवस्थेचा आवाज कुठेतरी खासदारापर्यंत पोहोचावा यासाठी रविवारी बेपत्ता खासदाराचे पोस्टर बसमधून प्रवास करणाऱ्या लोकांना देण्यात आले आणि बसेसवर चिकटवण्यात आले. सनी देओल जेव्हापासून गुरुदासपूर व पठाणकोट जिल्ह्यांचा खासदार झाला, तेव्हापासून तो दोन्ही जिल्ह्यात दिसला नाही किंवा त्याच्या वतीने कोणतेही विकासकाम केले गेले नाही, असा संताप स्थानिक जनतेने व्यक्त केला.
सनी देओल यांचा विरोध करणाऱ्या जनतेचा आरोप आहे की, “खासदार झाल्यापासून सनी देओल यांनी कधीही त्यांच्या मतदारसंघात भेट दिली नाही. त्यांनी कोणतीही विकास कामे केली नाहीत. २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत अशा लोकांना कोणत्याही पक्षाने तिकीट देऊ नये, कारण सनी देओल लोकांना मूर्ख बनवून विजयी झाला आहे”, असे लोक म्हणाले. तर काही आंदोलकांनी, “जर कोणी खासदार सनी देओलला शोधून आणले तर त्याला ५० हजार रुपयांचे बक्षीस देऊ” असेही सांगितले.
बॉलिवूड अभिनेते सनी देओल याचे अनेक चाहते आहेत. ‘गदर २’ चित्रपटानंतर सनी देओल यांची क्रेझ प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळाली. त्यांच्या आगामी अनेक सिनेमांची चर्चा असताना पंजाबमध्ये ते बेपत्ता असल्याचं पोस्टर लावण्यात आल्याने तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.