आपल्या विनोदाच्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे अंशुमन विचारे. ‘फु बाई फु’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘कानामागून आली’ ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सारख्या अनेक या विनोदी शोमध्ये काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तसेच ‘शिनमा’, ‘पोस्टर बॉयज’ सारख्या अनेक चित्रपटांतदेखील त्याने काम केले आहे. काही दिवसांपूर्वी सोनी मराठी वरील ‘सिंगिंग स्टार’ या गाण्याच्या शोमध्येही तो झळकला होता. अभिनय, गायनसारख्या कलांमध्ये दंग असलेला अंशुमन सोशल मीडियावरदेखील तितकाच सक्रिय असतो. अशातच त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. (Anshuman Vichare On Instagram)
अंशुमनने त्याच्या इनस्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर करत एका रिक्षाचालकाचे कौतुक केले आहे. ‘अशी प्रामाणिक माणसं या जगात आहेत म्हणून माणुसकी अजूनही जिवंत आहे’ असं अंशुमनने म्हटले आहे. खरंतर, त्याचा एक महागडा फोन हरवला होता आणि हा फोन एका रिक्षाचालकाला सापडला. यानंतर त्या रिक्षाचालकाने अंशुमनच्या पत्नीशी संपर्क साधत तो फोन परत केला. त्या रिक्षाचालकाचा हा प्रामाणिकपणा पाहून तो खूपच भारावला. या अभिनेत्याने सोशल मीडियावर या रिक्षाचालकाची माहिती शेअर करत त्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं आहे.
या व्हिडीओमध्ये अंशुमन त्या रिक्षाचालकाबरोबर गप्पा मारताना दिसत आहे. तसेच अंशुमनची पत्नी त्या रिक्षाचालकाचे आभार मानत आहे. “सध्याच्या या काळात कुणीही दुसऱ्याची वस्तू त्याला परत देत नाहीत. पण तुम्ही ती केलीत. त्यासाठी खरंच तुमचं खूप कौतुक व धन्यवाद. आम्ही तुम्हाला कायम लाक्षात ठेवू.” असं म्हणत त्या रिक्षाचालकाचे आभार मानले आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर रिक्षाचालकाचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी रिक्षाचालकाचे व अंशुमनचे कौतुक केले आहे. नेटकऱ्यांनी “अंशुमन तुम्ही पण ग्रेट आहात. तूही ही असाधारण गोष्ट पोस्ट केलीत आणि साळवी दादांचं कौतुक केलंस, यामुळे बाकी सर्वांना प्रोत्साहन मिळेल, खूप सुंदर, खूप छान, अंशुमन तुम्हाला या व्हिडीओसाठी धन्यवाद व राकेश यांना मानाचा मुजरा, खरोखर इमानदार राकेश साळवी तुमचा अभिमान आहे” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.