हिंदी सिनेसृष्टीत ज्युनिअर महमूद या नावाने लोकप्रिय असलेले अभिनेते गेले काही दिवस एका गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. ९० च्या दशकापर्यंत आपल्या अभिनयाने हिंदी सिनेविश्व गाजवलेले हे अभिनेते सध्या पोटाच्या कर्करोगाशी झुंज देत आहेत. अभिनेते जॉनी लिवर हे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला गेले होते. त्यानंतर महमूद यांच्या आजाराचे वृत्त समोर आले. जॉनी लीवर यांच्यानंतर मास्टर राजूदेखील त्यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. तेव्हा ज्युनिअर महमूद यांनी सचिन पिळगावकर व जितेंद्र यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. (Jitendra Met Junior Mehmood)
नुकतीच सचिन पिळगावकर यांनी ज्युनिअर महमूद यांना भेट घेतली असल्याचं सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत सांगितलं. या पोस्टद्वारे त्यांनी “मी माझ्या मित्राला भेटण्यासाठी गेलो होतो. पण ते झोपले असल्यामुळे आमची भेट झाली नाही. काही दिवसांपूर्वी मी त्यांच्याबरोबर व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला होता. मी त्यांच्या मुलाच्या संपर्कात असून त्यांच्या तब्येतीविषयी जाणून घेत आहे.” असं म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी महमूद यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचेदेखील आवाहन केले आहे.

अशातच जितेंद्रना त्यांच्या तब्येतीचे कळताच ते त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी मुंबईच्या घरी गेले आहेत. जितेंद्र यांनी महमूद यांची अवस्था पाहताच त्यांना अश्रु अनावर झाले. या भेटीचे काही फोटो समोर आले असून या फोटोमध्ये जितेंद्रना त्यांच्या मित्राची अस्वस्था बघून दु;ख झाले आहे. यावेळी त्यांच्याबरोबर जॉनी लीवर हेदेखील होते. ज्युनिअर महमूद यांनी जितेंद्र यांच्याबरोबर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि तेव्हापासून त्यांची मैत्री आहे.
दरम्यान, महमूद हे गेले अनेक दिवस आजारी असून त्यांना दोन महिन्यांपूर्वी पोटाचा कॅन्सर झाल्याचे समजले. हा कॅन्सर त्यांच्या यकृत व फुफ्फुसात पसरल्याचे समोर आले आहे. महमूद यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार असून त्यांच्याकडे फक्त ४० दिवस शिल्लक असल्याचे सांगण्यात येत आहे.