CID Actor Dinesh Phadnis Dies at 57 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो CID ने आजवर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. वीस वर्षाहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा या कार्यक्रमाने लाखो प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला. या शोमधील सर्वच पात्रांनी आपली अशी वेगळी छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली. या शोच्या प्रेक्षकांसाठी मात्र एक दुःखद बातमी समोर आली आहे. या शोमधील प्रेक्षकांच्या लाडक्या पात्राचं निधन झालं असल्याचं समोर आलं आहे.
गेले काही दिवस फ्रेडरिक्स उर्फ अभिनेते दिनेश फडणीस आजारी असल्याची बातमी चर्चेत होती. यानंतर आता या जगातून अखेरचा निरोप घेतला असल्याचं समोर आलं आहे. वयाच्या ५७व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. मुंबईतील तुंगा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान त्यांची मृत्यूशी असलेली झुंज अपयशी ठरली आहे. दिनेश यांच्या निधाच्या बातमीने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
दिनेश फडणीस यांनी साऱ्या प्रेक्षकवर्गावरही कायमच भरभरून प्रेम केलं. सोशल मीडियावरही ते बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असायचे. दिनेश यांच्या निधनानंतर इन्स्टाग्रामवरील त्यांच्या शेवटच्या पोस्टवर चाहते कमेंट्स करत त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. त्यांची शेवटची पोस्ट दोन आठवडे पूर्वीची असून या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या नातीबरोबरचा फोटो शेअर करत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
दिनेश यांनी त्यांच्या नातीबरोबर बरेच फोटो त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेले आहेत. विशेष म्हणजे दिनेश यांच्या नातीचा जन्म त्यांच्याचं वाढदिवसाला झाला आहे. त्यामुळे ते अनेकदा माझ्या मुलीने माझ्या वाढदिवसाला दिलेली सर्वात उत्कृष्ट गिफ्ट म्हणजे माझी नातं असं ते कौतुकाने बोलायचे. सोशल मीडियावर त्यांनी आपल्या पत्नीबरोबरचे तसेच नातीबरोबरचे अनेक फोटो शेअर केले आहेत.