सध्या चित्रपटगृहांमध्ये चर्चा सुरु आहे ती लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाची. ‘अॅनिमल’ चित्रपटाला सध्या जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची चुरशीची लढाई सुरु झाली होती. तुडुंब भरलेली चित्रपटगृहे, बाहेर लांबच्या लांब रंगलेल्या रांगा ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. चित्रपटातील प्रत्येक भूमिकेचं आणि त्याच्या पात्राचं प्रचंड कौतुक होत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद ही लाभतांना पाहायला मिळत आहे. (Bobby Deol Video)
अवघ्या दोन दिवसांत या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. या चित्रपटातील रणबीर कपूरच्या भूमिकेचं खास कौतुक होताना पाहायला मिळत आहे. चित्रपटातील आणखी एका कलाकाराचं नाव प्रेक्षकांच्या तोंडावर आहे. तो म्हणजे अभिनेता बॉबी देओल. बॉबी या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. त्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सोशल मीडियावरही प्रेक्षक त्याच्या अभिनयाचे तसेच त्याच्या पात्राचे कौतुक करताना थकत नाही आहेत. त्यामुळे होणारा प्रेमाचा वर्षाव पाहता अभिनेत्याला अश्रू अनावर झाले आहेत.
‘अॅनिमल’ या चित्रपटात बॉबीने मुक्याची भूमिका साकारली आहे. त्याच्या या पात्राला एकही संवाद नाही आहे. अशातच केवळ अभिनयाच्या जोरावर त्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. बॉबीला चित्रपटात फार कमी टाइम स्क्रीन शेअर मिळाली आहे असं असलं तरी त्याची भूमिका भाव खाऊन जात आहे. अभिनेत्यावर होणार कौतुक पाहता बॉबीलादेखील अश्रू अनावर झाले आणि तो रस्त्यातच रडू लागला. त्याचा एक व्हिडिओ विरल भयानीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटनवरून शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो सगळ्यांचे आभार मानताना व रडताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये बॉबी देओल हात जोडून कॅमेरासमोर बोलतो की, “खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे. एवढं प्रेम मिळतंय चित्रपटाला. माझ्या भूमिकेला. खूप धन्यवाद. असं वाटतंय मी स्वप्न बघतोय”. बॉबीच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक व कमेंटचा वर्षाव केला आहे.