अभिनेत्री कंगना रनौत बॉलिवूड चित्रपट तेजस मुळे विशेष चर्चेत होती. मात्र तिचा हा चित्रपटही फ्लॉप ठरला. कंगना रनौत ही तिच्या अभिनयाशिवाय स्पष्टवक्तेपणामुळेही चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती अनेकदा टोमणे मारत असते. मात्र, आज ही अभिनेत्री कोणाला टोमणा मारल्यामुळे नाही तर इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता हिला पाठिंबा दिल्याने चर्चेत आली आहे. एकीकडे नीना गुप्ता महिलांबाबतच्या वादग्रस्त विधानांमुळे ट्रोल होत असताना दुसरीकडे कंगना राणौतने त्यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. (kangana Ranaut On Neena Gupta)
कंगनाने इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट शेअर करत अभिनेत्रीला पाठिंबा दर्शविला आहे. पोस्ट शेअर करत कंगना म्हणाली, “नीना जी जे बोलल्या त्यावर इतक्या तीव्र प्रतिक्रिया का येत आहेत, हे मला कळत नाही आहे. स्त्री-पुरुष कधीही समान होऊ शकत नाही. ते प्रत्येक गोष्टीत एकमेकांपासून वेगळे आहेत. ते खरंच समान आहेत का? स्त्री-पुरुष सोडा, पण आपल्यापैकी कोणीही समान नाही” असं तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे.
यापुढे अभिनेत्री म्हणाली, “आपल्याकडे देव, गुरु, वरिष्ठ, पालक किंवा अगदी बॉसदेखील आहेत. यातील काही अधिक अनुभवी आहेत किंवा काही प्रत्यक्षात अधिक विकसित झाले आहेत, पण आपण कोणत्याही पातळीवर समान नाही. आम्हाला पुरुषाची गरज आहे का? अर्थातच आहे. जशी पुरुषाला एका स्त्रीची गरज असते. माझ्या आईला जर तिचे आयुष्य एकटेच जगावे लागले असते तर ते खूप अडचणींनी भरलेले असते. त्याचप्रमाणे माझे वडील देखील माझ्या आईशिवाय त्यांचे जीवन जगू शकत नाहीत. यात कसली लाज वाटते, हेच मला समजत नाही” असंही ती म्हणाली.

यापुढे स्त्री व पुरुषांबाबत कंगनाने लिहिलं आहे की, “पुरुषांना महिन्यातून सात दिवस रक्तस्त्राव (मासिक पाळी) होत नाही, तसेच त्यांच्यात ती दैवी स्त्री शक्ती नाही, ज्याच्यासाठी प्रत्येकजण तहानलेला असतो. मुलं स्वतःच्या घरात, बाहेर फिरताना असुरक्षित नाहीत, त्याच तुलनेत तरुण मुलींसाठी मात्र या गोष्टी अजिबात सोप्या नाहीत”, असं कंगनाने लिहिलं.