‘आभाळामाया’, ‘जुळून येती रेशीमगाठी’ यांसारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेलं अभिनेत्री म्हणजे सुकन्या मोने. त्यांनी अनेक चित्रपट, मालिका, नाटकं यांतून काम करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. या चित्रपटातील भूमिकेमुळे त्यादेखील चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. त्या सोशल मीडियावरही चांगल्याच सक्रिय असतात. आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत त्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच त्यांनी एका मुलाखतीत मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकार व तंत्रज्ञाविषयी भाष्य केलं आहे. ज्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. (Actress Sukanya Mone Talk About Television Industry)
‘द क्राफ्ट’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मालिकेतील कलाकार, तंत्रज्ञ यांच्या संघर्षाविषयी सांगताना त्यांनी असं म्हटलं आहे की, “आजही मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांना कमी लेखले जाते. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोण हा अजूनही दुय्यम आहे. पण मालिकेत काम करणे हे इतके सोपे नसते. याउलट मालिकेत काम करणे हे सगळ्यात अवघड काम आहे. मालिकेत काम करण्यासाठी संयम असावा लागतो. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. मालिकेत काम करताना तीन महीने पगारासाठी थांबावे लागते. त्यात पण निर्माते कधीकधी सवलत मागतात. मालिकेत काम करण्याची वेळ ही सर्वाधिक असते. त्यात पण त्यातील मुख्य कलाकारांची यात खूप दमछाक होते. त्यांना अजिबात विश्रांती मिळत नाहीत. त्यांना त्यांचं डाएट, व्यायाम सोडून काम करावे लागते. मालिकेनंतर ते लोकप्रिय झाले की त्यांना अनेक कार्यक्रमांना पाहुणे म्हणून जावे लागते आणि यानंतर पण ते शूटिंग करतात.”
आणखी वाचा – ‘कन्यादान’ मालिकेतील ‘या’ ऑनस्क्रीन जोडीने उरकला साखरपुडा सोहळा, पारंपरिक लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल
यापुढे ते असं म्हणाल्या आहेत की, “आपण स्वत:हून काही नियम घातले पाहिजेत. सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेतच आपण काम केले पाहिजे. लंच व पॅकअपसाठी ठरावीक वेळ आखली पाहिजे आणि यांची वाहिनीनेसुद्धा दखल घेतली पाहिजे. आम्ही पूर्वी तीन दिवसात एक एपिसोड करायचो पण आता टीआरपीमुळे ते आता होत नाही. एपिसोड निघण्यासाठी घाई केली जाते आणि याचा कलाकारांच्या आरोग्यावर परिणाम होतो.” असं त्यांनी या मुलाखतीत म्हटले आहे.
दरम्यान त्यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. यावर काही नेटकऱ्यांनी कमेंट्सद्वारे प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचबरोबर या मुलाखतीच्या व्हिडीओखालीदेखील अनेकांनी त्यांना ‘जुळून येती रेशीमगाठी’ ही मालिका आणि मालिकेमधील माईची भूमिका आवडल्याचेही सांगितले आहे. तसेच या मालिकेबद्दल प्रेमही व्यक्त केली आहे.