फॅशन डिझायनर रोहित बल सध्या गंभीर प्रकृतीशी झुंज देत आहे. त्यांना गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (ICU) व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. अहवालानुसार, त्यांची प्रकृती गंभीर आहे. हृदयविकारामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आली असल्याची बातमी समोर आली आहे. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण चंद यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Rohit Bal Admitted To ICU)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना छातीत तीव्र वेदना होत होत्या, त्यानंतर त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर असा निष्कर्ष काढला की, ते डायलेटेड कार्डिओमायोपॅथीने ग्रस्त आहेत. या आजारामध्ये हृदयाचे स्नायू कमकुवत व मोठे होतात. यामुळे, हृदय शरीराच्या इतर भागांमध्ये पुरेसे रक्त पंप करू शकत नाही. याआधीही त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि २०१० मध्ये त्यांची अँजिओप्लास्टीही झाली होती. सतत दारूच्या व्यसनामुळे व परिणामी आरोग्य समस्यांमुळे ही परिस्थिती अधिक तीव्र झाल्याचं समोर आलं आहे.
चित्रपटसृष्टीत रोहित बल यांना गुड्डू या नावाने ओळखलं जातं. श्रीनगरमध्ये जन्मलेल्या रोहित बलने १९८६ मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. देशातील सर्वात प्रसिद्ध फॅशन डिझायनर्सपैकी एक अशी त्यांची ओळख आहे. ट्रेडमार्क कमळ व मोराच्या आकृतिबंधांसाठी ते विशेष ओळखले जातात. बरेचदा ते काश्मिरी कलाकुसर व विणकामाबाबत त्यांच्या कामातून सांगताना दिसतात.
रोहित बल यांनी २००६ साली इंडियन फॅशन अवॉर्ड्समध्ये ‘डिझायनर ऑफ द इयर’ हा पुरस्कार पटकावला. तसेच २००१ मध्ये किंगफिशर फॅशन अचिव्हमेंट अवॉर्ड्समध्ये त्यांनी ‘डिझायनर ऑफ द इयर’ या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आलं. फेब्रुवारी २०१२ मध्ये, त्यांना लॅक्मे फॅशन वीकमध्ये ग्रँड फिनाले डिझायनर म्हणून निवडण्यात आलं होतं.