बेधडक, स्पष्टव्यक्ती अभिनेत्री म्हणून सुरभी भावे हिचं नाव आवर्जून घेतलं जातं. सुरभी नेहमीच तिच्या अभिनयाबरोबरचं स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असते. नेहमीच ती काही ना काही पोस्ट शेअर करून चाहत्यांसह संपर्कात राहत असते अशातच अभिनेत्रीने दिवाळीनिमित्त केलेली एक फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे. दिवाळीनिमित्त केलेल्या या पोस्टमध्ये सुरभीने फटाके न वाजवण्याचं आवाहन केलं असून तिचं हे आवाहन अनेकांना खटकलं असल्याचं पाहायला मिळतं आहे. (Surabhi Bhave Answers To Trollers)
दिवाळीनिमित्त केलेल्या पोस्टमध्ये सुरभी म्हणाली आहे की, “दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. या निमित्ताने एक आवाहन, हवेत आधीच खूप प्रदूषण आहे. त्यात फटाके वाजवून भर टाकण्यापेक्षा एकमेकांच्या घरी जाऊन भेटू शकतो किंवा उत्तम वाचन, उत्तम सिनेमा, उत्तम नाटक असे सर्व पाहून दिवाळी साजरी करू शकतो. तळटीप : आता जे मला उपदेशाचे डोस पाजतील की तू पण फटाके वाजवतच असशील वगैरे तर त्यांच्यासाठी. मी चौथीमध्ये असताना कारगिल युद्ध झालं होतं त्यावेळी मी फटाके न घेता गावात पैसे गोळा करून ते सैनिकांना दिले होते. तेव्हापासून मी जे फटाके वाजवणं बंद केलं ते आजतागायत मी फुलबाजी पण हातात घेतली नाही”.

यावर एका नेटकऱ्याने कमेंट करत सुरभीला ट्रोल करत म्हटलं आहे की, “शहाणपणा स्वतः जवळ ठेवा, आणि कारगिल सैनिकांना पैसे दिल्याचे भांडवल करू नका, बऱ्याच लोकांनी दिलेत. हे आव्हान वगैरे आता गैर लागू आहे. फटका उद्योगावर आज हजारो लोकांचा रोजगार आहे, इतर वेळी पण फटाके वाजवून आनंद साजरा करतात. प्रदूषणाबाबत इतर वेळी जागृती करत फिरा अगदी वाहने, पाणी, स्वच्छ्ता बरेच विषय आहेत ज्यामुळे प्रदूषण वर्षभर होते. डोळ्यावरील झापडं काढा आणि प्रदूषणाचे इतर वर्षभरातील रिपोर्ट बघा. कधी कोणत्या महिन्यात प्रदूषण जास्त असते आणि का असते, त्यावर काम करा. हिंदू सणांवेळी येणारी आठवण आता पब्लिसिटी देणार नाही. बाकी चालू दे नाटकं आपलं” असं म्हणत सुरभीला सुनावलं आहे. यावर प्रत्युत्तर करत सुरभीनेही कमेंट करत म्हटलं आहे की, “मी शहाणपण स्वतःकडे ठेवायचं की त्याचं प्रदर्शन मांडायचं हे तुम्ही ठरवू शकत नाही. पब्लिसिटीची गरज नाही अभिनेत्री असल्याने अनेकजण ओळखतात. रोजगार मिळतो ते दिसतं पण फटाका बनवताना कित्येक बालमजूरांचं शोषण होत, त्यांचा मृत्यू होतो ते नाही दिसत का ? कारगिलचं भांडवल करावं हा मुद्दा तुमच्या डोक्यातून आला माझ्या नाही, नुसतं विवेकानंदांचा फोटो लावून काही होत नाही विचार आचरणात आणा. हा आता तुमचा फटाक्यांचा बिझनेस असेल तर झोंबेल तुम्हाला हे आणि हो मी हिंदू असल्याचा मला नितांत अभिमान आहे यासाठी कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, बाकी तुमचा शहाणपण घरात दाखवत असालच” असं म्हटलं आहे.

तर आणखी एका युजरने कमेंट करत सुरभीला टोकलं आहे, युजरने असं म्हटलं आहे की, “फटाके कमी वाजवा असं सांगा पण कोणीही वाजवू नका असं सांगू नका. दिवाळीतले फटाके नुसती मजा म्हणून नाही वाजवले जात, तर त्यामागे काही कारण आहे. प्रथम ते जाणून घ्यावं. आणि जोपर्यंत ईदच्या वेळी बकरे कापू नका किंवा क्रिसमसला झाडं कापू नका सांगायचं धैर्य करत नाही तोपर्यंत फटाके वाजवू नका असंही सांगू नये असं मला वाटतं”. यावर रिप्लाय देत सुरभीने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलेलं पाहायला मिळतंय, सुरभी म्हणाली, “प्रत्येक ठिकाणी आमचा धर्म तुमचा धर्म असं करण्यात वेळ का घालवावा? मी जे आचरणात आणते तेच सांगायचा नैतीक अधिकार मला आहे आणि मी तेवढंच सांगितलं. मी शाकाहारी आहे, मी हिंदू आहे, त्यामुळे मी कधी बकरा कापला नाही किंवा ख्रिसमसला झाडाचे गोडवे गायले नाहीत. प्रदूषणामुळे जर फटाके वाजवू नका असं म्हटलं तर गैर काय आहे? फटाके (एक प्रकारची दारू) उडवण्यात काय कारण आहे ते मला माहित नाही कृपया माझ्या ज्ञानात भर टाकावी. माझ्या पोस्टमध्ये कुठेच धार्मिक मुद्दा नव्हता तो आपल्या कमेंट मध्ये आला म्हणून हा रिप्लाय” असं म्हणत चांगलीच कानउघाडणी केली आहे.

शिवाय ट्रोलर्सला उत्तर देत तिने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. यांत तिने म्हटलं आहे की, “माझा मूळ मुद्दा न कळताच अकलेचे तारे तोडणाऱ्या सर्वांना शुभ दीपावली. माझ्या आधीच्या पोस्टला उगाच ट्रोल करून टाईमपास करणाऱ्यांनो अकलेचे रॉकेट उडवा आणि विचारांचे अनार उडवा. आणि हो लवकर डोळ्यावर पट्टी बांधली आहे ना ती सोडून बघा, जग सुंदर दिसेल”.