यंदा दिवाळीनिमित्त सर्वत्र आनंदाचं व उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. सर्वत्र दिवाळीची जोरदार धामधूम सुरू आहे. सामान्य लोकांप्रमाणे मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी दिवाळीचे खास फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांनी साजरा केलेल्या दिवाळीचा आनंद त्यांनी आपल्या चाहत्यांबरोबर द्विगुणित केला आहे. अशातच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बने याने शेअर केलेल्या व्हिडीओने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. (Nikhil Bane Shared Diwali Special Video)
निखिलने त्याच्या चाळीतल्या दिवाळीची खास झलक इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. निखिलने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये सगळ्यांच्या घरासमोर सारखेच आकाश कंदील लावलेले दिसत आहेत. त्याचबरोबर घरोघरी स्त्रिया एकत्र बसून रांगोळी देखील काढत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच या व्हिडीओखाली निखिलने ‘एकोप्याची दिवाळी…’ असं कॅप्शनसुद्धा दिलं आहे. निखिलने शेअर केलेल्या या व्हिडीओमुळे तो राहत असलेल्या ठिकाणाविषयी त्याचबरोबर चाळसंस्कृतीविषयी त्याला असणारं प्रेम स्पष्टपणे दिसून येत आहे.
निखिलने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली त्याच्या अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. या व्हिडिओखाली नेटकऱ्यांनी ‘अशी दिवाळी सर्वत्र साजरी होवो..’, ‘हीच खरी दिवाळी’, ‘चाळीतली दिवाळी’ त्याचबरोबर ‘चाळीतल्या दिवाळीची मज्जाच वेगळी असते’ अशा अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचबरोबर निखिलला त्याच्या अनेक चाहत्यांनी दिवाळीनिमित्त ‘शुभ दीपावली’ म्हणत दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
दरम्यान ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे निखिल नावारुपाला आला आणि घराघरांत तो लोकप्रिय झाला. आपल्या विनोदाच्या अनोख्या शैलीने त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नुकतीच त्याने ‘बॉईज ४’ या चित्रपटातदेखील महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेलाही प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. एवढी प्रसिद्धी मिळवूनही तो आताही भांडूपच्या एका चाळीतील घरात राहतो. त्यामुळे त्याच्या या साध्या राहणीमानाचं मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.