‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला कार्तिका म्हणजे अभिनेता ऋतुराज फडके. या मालिकेत त्याने मुख्य भूमिकेत असणाऱ्या इंद्राच्या भावाची भूमिका केली होती. या नकारात्मक भूमिकेतून त्याने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं वेगळं असं स्थान निर्माण केलं. ऋतुराजचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. त्याला नेहमीच त्याच्या चाहत्यांकडून प्रेम मिळत असतं. तो सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. नुकतंच त्याने एक फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. त्यानं स्वतःचं नवं कोरं घर घेतलं आहे. (ruturaj phadke buy new house)
स्वतःचं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. तसंच ऋतुराजचंही हे स्वप्न होतं. नुकतंच त्याचं हे स्वप्न पूर्ण झालं आहे. ऋतुराजच्या बायकोने एक खास फोटो शेअर करत ही बातमी ऋतुराजच्या चाहत्यांना दिली. ऋतुराज व त्यांची बायको प्रिती हिने घराची चावी धरुन हा खास फोटो शेअर केला. त्या फोटोला भलं मोठं कॅप्शन देत त्यांनी घर घेण्यापर्यंतची कैफियत सांगितली. ती लिहिते, ‘स्वतःचं हक्काचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्नं असतं. ऋतुराज आणि मी बरीच स्वप्नं पाहिली, त्यातलच एक स्वप्नं म्हणजे “आपलं स्वतःच हक्काचं घर”. ते घर लहान किंवा मोठं कसंही असो. पण ते आपलं स्वतःच असावं. जानेवारी २०२३ मध्ये आमचं लग्न झालं आणि लग्नानंतर आम्ही दोघंही आमच्या कामात व्यस्त झालो. त्यामुळे अंबेजोगाईला जाऊन आमची कुलदेवी योगेश्वरी आणि गुहाघरला व्यडेश्वरच्या दर्शनाचा योग काही आला नाही. अधिक महिन्यात आम्हाला जसा वेळ मिळाला तसं आम्ही कर्जतला जाऊन व्यडेश्वर आणि योगेश्वरी देवीचे दर्शन घेतलं, ओटी भरुन आलो. त्यांचे आभार मानले आणि बऱ्याच गोष्टींसाठी प्रार्थना केली’.
ती पुढे लिहीते, ‘काही दिवसांपूर्वी, आमचं “आपलं स्वतःचं घर” हे स्वप्न पूर्ण झालं. आमची पहिली दिवाळी आज आम्ही आमच्या स्वतःच्या घरी साजरी करतो आहोत. योगायोग म्हणजे त्या बिल्डिंगचं नाव “योगेश्वरी”. ते म्हणतात ना, “अगर किसी चीज़ को दिल से चाहो, तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में लग जाती है” हे आम्ही अनुभवलं. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्यावर कायम असुद्या. दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा!, असं लिहीत त्यांनी स्वतःच्या घरासाठी पाहिलेलं स्वप्न पूर्णत्वास उतरल्याची आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली.
या पोस्टवर नेटकऱ्यांसह कलाकरांनीदेखील कमेंट व लाईकचा वर्षाव करत त्यांना शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री तितिक्षा तावडेनेही, ‘खूप खूप खूप शुभेच्छा’ अशी कमेंट केली आहे. एका नेटकऱ्याने लिहीलं की, ‘हे वाचून खूप आनंद झाला. खूप खूप अभिनंदना आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!’, अशी कमेंट करत आनंद व्यक्त केला आहे.