भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनावर आधारित एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्रसाद ओक महत्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा बाबासाहेबांवर आधारित नसून त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाला आपल्या कॅमेरात त्या दिवसाची चित्र कैद करणाऱ्या एका व्यक्तीवर आधारित आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून त्या दिवशीची ती चित्र आपापल्या कॅमेरात टिपणारा अवलिया कलाकार नामदेव व्हटकर यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आहे. (Prasad Oak On Mahaparinirvan)
व्हटकर यांच्या कॅमेराच्या रीळने जे चित्रित केलं ते लवकरच मोठया पडद्यावर पाहणं रंजक ठरणार आहे. या चित्रपटाचं नुकतंच चित्रीकरण पूर्ण झालं असून या भव्य चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव चित्रपटात व्हटकरांची मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेता प्रसाद ओक याने मांडली आहे. चित्रीकरदरम्यानचा एक पाठमोरा आणि नजरेला भिडणारा असा फोटो शेअर करत प्रसादने लिहिलेली ही पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
प्रसादने पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, “महापरिनिर्वाण” आज अखेरीस ४० दिवसांचा अत्यंत अवघड, खडतर असा पण प्रचंड समाधान देणारा शूटिंगचा प्रवास संपला. माझ्या संपूर्ण टीम चे मनःपूर्वक आभार. माझे सहकलाकार अंजली पाटील, गौरव मोरे, कुणाल मेश्राम, कमलेश सावंत, हेमल इंगळे तुमचं सेट वरचं सोबत असणं खूप मोलाचं आणि भार हलका करणारं होतं. फुलवा, तुझ्यासोबत पहिल्यांदाच काम केलं मी पण खूप मज्जा आली. नितीश नांदगावकर फार सुंदर सेट्स आणि चंद्रकांत सोनावणे सर. एखादी बाई दागिना कसा मिरवते तसे तुमचे कपडे घालून मिरवावसं वाटलं, वा. वा. माझी मेक अप टीम सलीम, प्रताप, आणि सुन्या तुम्हाला खूप प्रेम! दिग्दर्शक शैलेंद्र बागडे सर, छायाचित्रकार अमर कांबळे आणि निर्माते आशिष सर आणि सुनील सर. तुमच्या कष्टांचं कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाही आहेत. इतकं अचूक काम करणारे निर्माते, छायाचित्रकार आणि लेखक दिग्दर्शक एकत्रपणे फार कमी वेळ अनुभवायला मिळतात. हा संपूर्ण प्रवास अविस्मरणीय झाला त्याचं श्रेय संपूर्ण टीमला.”
त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत चित्रपटाची उत्सुकता व्यक्त केली आहे. त्याच्या या पोस्टवर अभिनेता सिद्धार्थ जाधवने कमेंट करत “अभिनंदन प्रसाद दा. हा सिनेमा खूप स्पेशल आहे. वाट बघतोय. आणि तुम्ही कमाल काम केलं असेल यांत शंकांचं नाही. खूप शुभेच्छा” असं म्हणत चित्रपटाबाबतची उत्सुकता व्यक्त केली आहे.