बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. चित्रपटसृष्टीतून सध्या आमिर खानने काढता पाय घेतलेला दिसतोय. अशातच आमिरच्या वैयक्तिक आयुष्याबाबतची एक खबर समोर आली आहे. हा अभिनेता लवकरच स्वप्नांची नगरी मुंबईचा निरोप घेणार असल्याची बातमी समोर आली आहे. येत्या दोन महिन्यांत आमिर खान चेन्नईला राहायला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. चेन्नईला शिफ्ट होण्याचे सर्वात मोठे कारण हे आमिर खानची आई झीनत हुसैन आहे. (Aamir Khan Leaving Mumbai)
इंडिया टुडेबरोबर अभिनेत्याच्या जवळच्या एका सूत्राने साधलेल्या संवादा दरम्यान सांगितले की, “आमिर खानसाठी, त्याचे कुटुंब खूप महत्वाचे आहे. आणि तो सर्वप्रथम कुटुंबाला प्राधान्य देतो. त्याची आई चेन्नईत राहते. आणि सध्या तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आणि त्याच्या या अशा परिस्थितीत आमिरला त्याचा सगळा वेळ आईबरोबर घालवायचा आहे. याच कारणामुळे आमिर सध्या चेन्नईला शिफ्ट होण्याचा विचार करत आहे.” सुत्रांच्या माहितीनुसार, चेन्नईत आमिर खानच्या आईवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयाजवळील हॉटेलमध्येच तो राहणार आहे. आमिर कामाबरोबरच आपल्या कुटुंबाला वेळ देणं पसंत करतो.
आमिर खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, काही दिवसांपूर्वीच आमिरने त्याच्या आगामी ‘सीतारे जमीन पर’ या चित्रपटाची घोषणा केली. याबाबत एका वृत्तवाहिनीबरोबर जेव्हा आमिरने चर्चा केली, तेव्हा तो म्हणाला, ‘माझ्या आगामी चित्रपटाबाबत मी अद्याप फारशी चर्चा केलेली नाही. सध्या मी फक्त चित्रपटाचे नाव सांगू शकतो. ‘सीतारे जमीन पर’ असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट माझा जुना चित्रपट ‘तारे जमीन पर’ सारखाच आहे.
‘सीतारे जमीन पर’ चित्रपटात ९ मुलांची कथा दाखवण्यात येणार आहे, या मुलांच्या आयुष्यात अनेक समस्या असतात. याबद्दल बोलताना आमिरने दावा करत असंही म्हटलं आहे की, चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही खूप हसाल. आमिरचा हा चित्रपट पुढील वर्षी २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे.