‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली जोडी म्हणजे मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे. या दोघांनीही त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. काही दिवसांपूर्वीच या जोडीने ‘आमचं ठरलं’ म्हणत चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली. प्रेमाची कबुली दिल्यानंतर लवकरच ही जोडी विवाहबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. प्रथमेश व मुग्धा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. (Mugdha Vaishampayan On Marriage Age)
सोशल मीडियावरून ही जोडी नेहमीच काही ना काही शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून ड्राइव्ह करताना गाणं गातानाचा व्हिडीओ शेअर केल्याने या जोडीला नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं होतं. प्रेक्षकांनी काळजीपोटी त्यांना सल्ला दिला होता. त्यानंतर आता प्रथमेश मुग्धाचा लग्नाबाबत भाष्य केलेला एक व्हिडीओ साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. प्रथमेश व मुग्धा ‘वैचारिक किडा’ या युट्युब चॅनेलच्याच्या एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी त्यांनी दिलेली मुलाखत पाहणं रंजक ठरतंय. या कार्यक्रमात घेण्यात येणाऱ्या मुलाखतीत प्रथमेशने मुग्धाला प्रश्न विचारलेले पाहायला मिळत आहेत.
मुलाखती दरम्यान प्रथमेश व मुग्धा यांनी लग्नसंस्था हा विषय निवडला होता. दरम्यान प्रथमेशने मुग्धाला प्रश्न विचारला की, “आताचा एक ट्रेंड असा आहे की, पूर्वी चोवीस पंचवीस वर्षात लग्न उरकली जायची, तर मागच्या काही वर्षांमध्ये अठ्ठावीस-तिशीपर्यंत लग्नाचा विचार केला जात नाही किंवा आरामात लग्न करूया अशी भावना असते, याबद्दल तुला काय वाटतं?”. प्रथमेशने विचारलेल्या या प्रश्नावर मुग्धाने उत्तर देत आपलं मत स्पष्ट केलं आहे.
प्रथमेशने लग्नाच्या वयासंदर्भात विचारलेल्या या प्रश्नावर उत्तर देत मुग्धा म्हणाली, “नाही. मला असं नाही वाटत आहे. असं नाही आहे की, मी लवकर लग्न करतेय म्हणून मी हे बोलतेय. मला असं वाटतं की, आपल्या पूर्वजांनी काहीतरी विचार करून मुलीचं आणि मुलाचं लग्नाचं वय ठरवलं आहे. अर्थात पूर्वीच्या काळात लग्न करताना मुलाच्या आणि मुलीच्या वयात जे अंतर असायचं ते १०० टक्के चुकीचं आहे. पण, अमुक-अमुक वयात लग्न झालं पाहिजे यामागे काहीतरी लॉजिक नक्कीच असणार आहे. विशिष्ट वयात लग्न का झालं पाहिजे? यामागची कारण तुम्हा-आम्हा सर्वांनाच माहिती आहेत. फक्त आपली जनरेशन ती कारणं स्वीकारत नाही. कारण, त्यांना स्वातंत्र्य हवं असतं, उशिरा लग्न करायचं असतं, स्वत:ची स्पेस सोडायची नसते वगैरे वगैरे…आणि यासाठी फक्त वयाला दोष दिला जातो. मला या गोष्टी पटत नाहीत. योग्य वयात योग्य गोष्टी झाल्या पाहिजेत, असं मला वाटतं.”