बाईपणाची गोष्ट सांगणाऱ्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत बरीच धुमाकुळ घातली होती. चित्रपटात ६ बहिणींच्या भूमिकेत मराठीतील ६ उत्कृष्ट अभिनेत्री झळकल्या होत्या त्यापैकी एक अभिनेत्री म्हणजे सुचित्रा बांदेकर. सुचित्रा यांनी आजवर बऱ्याच मालिका, चित्रपटांमध्ये काम करत स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अशा या उत्कृष्ट अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. त्यातच त्यांच्या मुलानं म्हणजेच सोहम बांदेकरने त्याच्या आईसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरल होताना दिसत आहे. (Suchitra bandekar Bday special post)
सुचित्रा यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकलीत. त्या जितक्या छान अभिनेत्री आहेत तितक्याच उत्तम गृहिणीही आहेत. त्या आई म्हणूनही आपली जबाबदारी नेहमी उत्तमरित्या पार पाडताना दिसतात. त्यांची व आदेश बांदेकरांची जोडी तर मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडींपैकी एक म्हणून ओळखली जाते. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
त्यानिमित्त सोहमने त्यांच्या आईचे छान फोटो पोस्ट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पोस्ट केलेल्या फोटोतील एका फोटोत त्या हिरव्या साडीत सुंदर मराठमोळ्या अंदाजात दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत गुलाबी कुर्तामध्ये त्या मांजरीला जवळ घेत दिसत आहेत. हे फोटो पोस्ट करत तो लिहीतो, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई! गेल्या काही वर्षात जेवढा माझा आगाऊपणा वाढला आहे तेवढीच तुझी सहनशीलताही वाढली आहे. अशीच नेहमी सुंदर दिसत राहा आणि आम्हाला तुझे छान छान फोटो काढू दे”, असं लिहीत त्याने आईचं गोड कौतुक करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
या पोस्टवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हॅपी बर्थडे सुचित्रा ताई म्हणत अभिनेता निखील राऊतसह इतर कलाकारांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात सुचित्रा महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या. त्यांचा चित्रपटातील अंदाज व लूक प्रेक्षकांना खूपच आवडला होता. या चित्रपटात सुचित्रा यांच्यासह अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, शिल्पा नवलकर, दीपा परब या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसल्या होत्या. सुचित्रा यांनी या चित्रपटात ‘पल्लवी’ हे पात्र साकारलं होतं. या चित्रपटाला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं आहे.