अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी नेहमीच आपल्या सहज, सुंदर अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकतात. गेली अनेक वर्षे त्यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना भूरळ पाडली. त्यांनी साकारलेलं प्रत्येक पात्र नेहमीच प्रेक्षकांना आपलंस वाटलं. सध्या त्या ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत रत्नमाला मोहितेची भूमिका करत आहेत. मालिकेसह त्या आपल्या अभिनयशैलीतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचल्या आहेत. त्यामुळे त्यांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. निवेदिता सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय असतात. कामासह विविध पोस्ट त्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकताच त्यांनी एक विमान प्रवासातील व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.(nivedita saraf share a video)
विविध विमानांमध्ये सध्या थेट मराठीतून उद्घोषण करण्यात येताना दिसतं. बऱ्याचदा असे व्हिडिओ समोर येताना दिसतात. मराठी भाषेतील हे व्हिडिओ सोशल मीडियावर बरेच व्हायरल होताना दिसतात. नुकताच अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी विमान प्रवासादरम्यानचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत त्यांनी भाची व एका विमानाची सह-विमानचालिका अदिती परांजपे मराठी भाषेत उद्घोषणा देत असताना पाहायला मिळाली.
आणखी वाचा -शाहरुख खानच्या ‘जवान’ची बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई, आतापर्यंत कमवले तब्बल इतके कोटी
“ शुभ सकाळ! मी तुमची कॅप्टन अदिती परांजपे. मी तुम्हा सर्वांचं इंडीगोच्या वतीने आणि माझ्या सर्व सहकार्यांच्या वतीने फ्लाईट क्रमांक ‘६ई५०१२’वर स्वागत करते. ” असं म्हणत तिने सर्व प्रवाशांचं स्वागत केलं. त्यानंतर तिने विमानाशी व प्रवासाशी संलग्न विविध गोष्टींची माहिती दिली. शिवाय प्रवासादरम्यान प्रवाशांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधा या संदर्भातील पूर्ण माहिती मराठीतून दिली.‘मला तुझा खूप अभिमान आहे अदिती. कॅप्टन अदिती परांजपे’, असं लिहीत तिने या व्हिडिओला कॅप्शन देत तिचं कौतुक केलं आहे.
निवेदीता यांनी ‘कन्यादिनी’ सायली संजीवसह अदिती परांजपे हीचा फोटो शेअर करत कन्यादिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आता विमान प्रवासातील हा व्हिडिओ पोस्ट करत तिचं कौतुक केलं आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी बरेच कमेंट केले आहेत. या उद्घोषणात तिने मराठी भाषेचा वापर केल्यामुळे तिचे विशेष कौतुक केलं जात आहे. एका नेटकऱ्याने “अरे वा असेच सगळीकडे आपल्या मराठी भाषेचा वापर करायला पाहिजे आणि आपण सुद्धा सगळीकडे मराठीच बोलली पाहिजे”, अशी कमेंट केली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ बराच चर्चेत आहे.