जगभरात लाखो चाहते असलेल्या सचिन तेंडुलकरचा खूप मोठा फॅन फॉलोविंग आहे. सचिन तेंडुलकरला भेटण्यासाठी त्याचे चाहते नेहमीच आसुसलेले असतात. अशातच नुकतीच एका लोकप्रिय मराठी शास्त्रीय गायिकेला सचिन तेंडुलकरला भेण्याची सुवर्णसंधी मिळाली. कलाप्रेमी असलेल्या सचिन तेंडुलकरसाठी व त्याच्या जवळच्या व्यक्तींसाठी खासगी मैफिल करण्याची संधी मराठमोळी शास्त्रीय गायिका सावनी शेंडेला मिळाली. दरम्यान आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर करत तिने सचिन तेंडुलकर व अंजली यांच्या स्वभावाबाबतही भाष्य केलं. (Sawani Shende On Sachin Tendulkar)
बेला शेंडेची बहिण लोकप्रिय शास्त्रीय गायिका सावनी शेंडे आहे. सावनी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असलेली पाहायला मिळते. सोशल मीडियावरून ती तिच्या कार्यक्रमाबद्दल तसेच कार्यक्रमांदरम्यान आलेल्या अनुभवांबद्दल चाहत्यांना नेहमीच अपडेट्स देत असते. यावेळी तिने सचिन तेंडुलकरबरोबरचा अनुभव शेअर केला आहे.
सावनी शेंडेने सचिन तेंडुलकरबरोबरचे काही फोटो पोस्ट करत लिहिलं, “काल खास भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यासाठी शास्त्रीय गायन करण्याची संधी मिळाली. हे माझं भाग्य आहे. क्रिकेटचा देव माझ्यासमोर बसून शास्त्रीय संगीत ऐकत होता. माझा आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे खरोखरच शब्द नाही आहेत. काय व्यक्तिमत्त्व आहे त्यांचं! खूप साधे, नम्र आणि समोरच्याला खूप आदर देणारे. मी शास्त्रीय संगीतातील बारकावे सांगितल्यावर ते ज्या प्रकारे तल्लीन होऊन आणि मन लावून शास्त्रीय गायन ऐकत होते ते खरंच बघण्यासारखं होतं.”

पुढे तिने लिहिलं, “अंजलीदेखील स्वभावाने खूप चांगल्या आहेत… हॅट्स ऑफ. विक्रम आणि निलेश, मला आमंत्रित केल्याबद्दल. धन्यवाद. ही माझ्यासाठी अविस्मरणीय आठवण राहील. कायम माझ्या हृदयाजवळ असेल. कार्यक्रमाचा क्षण अन् क्षण एन्जॉय केल्याबद्दल सचिन व अंजली तुमचे खूप आभार.” सावनीच्या या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं असून त्यावर नेटकरी कमेंट करत आहेत.