सनी देओलच्या ‘गदर २’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या ‘गदर २’ला मिळालेलं यश एण्जॉय करताना दिसत आहे. सनीसाठी हा चित्रपट म्हणजे कलाक्षेत्रामध्ये दमदार कमबॅक करणारा चित्रपट ठरला आहे. पण सारं काही सुरळीत सुरु असताना देओल कुटुंबीयांबाबत एक माहिती समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना अमेरिकेमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं आहे.
सनी वडील धर्मेंद्र यांना उपचारासाठी अमेरिकेमध्ये घेऊन गेला असल्याचं बोलण्यात येत आहे. अद्याप याबाबत देओल कुटुंबियांकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. धर्मेंद्र ८७ वर्षांचे आहेत. ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास २० दिवस धर्मेंद्र व सनी अमेरिकेमध्येच राहणार आहेत. तिथेच सनी त्याच्या वडिलांची काळजी घेणार आहे.
आणखी वाचा – “…म्हणून मला नग्न केलं”, मराठी सोशल मीडिया स्टारचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “ते खूप अपमान…”
सुत्रांच्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांना वयाच्या ८७व्या वर्षी काही शारीरिक त्रास होत आहे. त्या उपचारासाठीच त्यांना अमेरिकेमध्ये घेऊन जाण्यात आलं आहे. १५ ते २० दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात येतील. सध्यातरी त्यांची प्रकृती स्थिर आहे. वयाच्या ८७व्या वर्षीही धर्मेंद्र सोशल मीडियावर अधिकाधिक सक्रिय असतात. विविध व्हिडीओ व फोटो ते पोस्ट करताना दिसतात.
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटात धर्मेंद्र यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. इतकंच नव्हे तर शाहिद कपूर व क्रिती सेनॉनच्या आगामी चित्रपटामध्येही धर्मेंद्र दिसणार आहेत. या चित्रपटाचं नाव नेमकं काय? हे अद्यापही समोर आलेलं नाही. पण या वयामध्ये धर्मेंद्र यांची काम करण्याची उर्जा व ताकद खरंच कौतुकास्पद आहे.