सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्कर गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराचा सामना करत आहेत. लिव्हरला ट्युमर असल्याचं डॉक्टरांनी संपूर्ण तपासणी झाल्यानंतर दीपिका व पती शोएब इब्राहिमला सांगितलं. पण सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये हा ट्युमर नक्की कसला आहे? याबाबत तपासण्या सुरु होत्या. काही दिवसांपूर्वीच तपासणीमधून धक्कादायक कारण समोर आलं. लिव्हरला असणारा ट्युमर हा कॅन्सर असल्याचं डॉक्टरांनी दीपिकाला सांगितलं. त्यानंतर त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनाच मोठा धक्का बसला. दीपिका व शोएबने युट्युबद्वारे व्हिडीओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली. दीपिकाला स्टेज २चा कॅन्सर आहे. आता लवकरच तिची सर्जरी होणार आहे. याचबाबत शोएबने एक पोस्ट शेअर केली आहे. (Dipika kakar cancer surgery)
दीपिका, शोएब आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी हा काळ खूप कठीण आहे. दीपिकाला या गंभीर आजारावर मात करण्यासाठी सगळेच पाठिंबा देत आहेत. शिवाय दीपिका व शोएबचा दोन वर्षांचा मुलगा आहे. आईविना त्यालाही राहणं आता शक्य होत नाही. मात्र लेक दोन वर्षांचा असूनही सगळं समजून घेत असल्याचं शोएबने मध्यंतरी सांगितलं होतं. आज दीपिकाची सर्जरी होणार आहे. सगळ्यांनी तिच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करा असं शोएबने म्हटलं.
आणखी वाचा – मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्याचे निधन, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, कलाविश्वावर शोककळा

शोएब पोस्ट शेअर करत म्हणाला, “दीपिकाची सर्जरी होणार आहे. या सर्जरीला खूप वेळ लागणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनेची तिला गरज आहे. कृपया तिच्यासाठी प्रार्थना करा”. शोएबने बायकोसाठी सगळ्यांना प्रार्थना करण्याची हात जोडून विनंती केली आहे. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये दीपिकाला अगदी थोड्या प्रमाणात पोटदुखीचा त्रास होत होता. मात्र हा त्रास वाढल्यानंतर ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी तिला टेनिस बॉलच्या आकाराचा लिव्हरमध्ये ट्युमर असल्याचं सांगितलं.
हा ट्युमर कॅन्सरच असल्याचं काही दिवसांतच निदान झालं. त्यानंतर सर्जरीसाठी दीपिकाला नेण्यात येणार होतं. मात्र ताप, सर्दी, खोकल्यामुळे दीपिकाची तब्येत अचानक बिघडली. अशा परिस्थितीत सर्जरी करणं धोक्याचं होतं. म्हणून डॉक्टरांनी काही दिवस थांबण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे सर्जरी थांबवण्यात आली. अखेरीस आज सर्जरी पूर्ण होणार आहे. दीपिका लवकरात लवकर या आजारामधून बाहेर पडावी आणि पूर्वीसारखं आयुष्य जगावं म्हणून कुटुंबियांसह चाहतेमंडळीही प्रार्थना करत आहेत.