‘भाभीजी घर पर है’ मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शुभांगी अत्रे. शुभांगीने तिच्या वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिका उत्तमपणे साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. कामाबरोबरच शुभांगी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेचा विषय ठरली. दोन ते तीन महिन्यांपूर्वीच तिचा घटस्फोट झाला. तब्बल २२ वर्षांच्या संसारानंतर पती पियुष पुरेपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. मात्र घटस्फोटानंतर काही भलतंच घडलं. शुभांगीचा पूर्वाश्रमीचा पती पियुषचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. यकृतासंबंधित आजारामुळे तो त्रस्त होता. अखेरीस त्याची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. आता या सगळ्याबाबतच शुभांगीने भाष्य केलं आहे. (shubhangi atre on her ex husband death)
पियुषचं निधन झाल्यानंतर शुभांगीला या दुःखद घटनेबाबत विचारण्यात आलं होतं. मात्र ती याविषयी बोलू इच्छित नव्हती. शुभांगीने या सगळ्यामधून बाहेर पडण्यास थोडा वेळ लागेल नंतरच याविषयी बोलेन असं म्हटलं होतं. आता तिने या सगळ्या विषयी उघडपणे बोलणं पसंत केलं आहे. तसेच पियुषच्या निधनानंतर तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. याचा काय परिणाम झाला? यावरही शुभांगीने भाष्य केलं.
आणखी वाचा – महेश मांजरेकर व रेणूका शहाणेंचा ‘देवमाणूस’ चित्रपट का पाहावा?, दमदार कथा पाहूनच…
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत शुभांगी म्हणाली, “योग्य ती माहिती नसतानाही लोकांना फक्त बोलणं खूपच सोपं जातं. सगळ्यांना असं वाटतं की, मला यश मिळाल्यानंतर मी पियुषला सोडून दिलं. पण असं काहीच नाही. वेगवेगळं राहायचं हे आमचं पहिल्यापासून ठरलं होतं. माझं लग्न टिकून राहावं म्हणून मी खूप प्रयत्न केले. पण आमच्यामध्ये सुरळीत काही झालंच नाही”.
पुढे ती म्हणाली, “त्याला रिहॅब सेंटरमध्ये पाठवूनही काहीच झालं नाही. माझ्या दोन्ही कुटुंबानीही त्याला योग्य ते मार्गदर्शन करण्याचा खूप प्रयत्न केला. पण नशेमध्ये त्याने त्याचं आयुष्यच संपवलं. माझ्यासाठी माझी मुलगी आशी सर्वात महत्त्वाची आहे. म्हणूनच त्याच्यापासून विभक्त होण्याचा मी निर्णय घेतला होता. २०१८ ते २०१९ पासूनच आमच्यामध्ये वाद होऊ लागले होते. त्यानंतर २०२५मध्ये आम्ही घटस्फोट घेतला. त्यानंतरही मी पियुषच्या संपर्कात होते. नशा ही अशी आहे जी त्या व्यक्तीलाच नव्हे तर त्याच्याशी संबंधित असलेल्या इतरांनाही त्रास देते. लहान मुलांना याचा अधिक त्रास होतो. जे मुकाट्याने सगळं सहन करत असतात. माझ्यापेक्षा तर माझ्या मुलीनेच सर्वात जास्त दुःख सहन केलं आहे असं मला वाटतं”. शुभांगीने तिची व्यथा सांगत भावनांना वाट मोकळी करुन दिली.