Kiran Gaikwad Devmanus 3 Marathi Serial : चित्रपट, नाटक, ओटीटीप्रमाणेच मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनाचं प्रभावी माध्यम आहे. मालिकांमध्ये गुंतून राहणारा मोठा प्रेक्षक आजही आहे. एखादी मालिका सुपरहीट ठरली की, प्रेक्षक त्या कलाकृतीवर जीवापाड प्रेम करतात. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे झी मराठी वाहिनीवरील ‘देवमाणूस’ मालिका. या मालिकेने प्रेक्षकांना अगदी वेड लावलं. ‘देवमाणूस’ला मिळालेला प्रतिसाद पाहता या मालिकेचा दुसराही भाग आला. मालिकेची कथा सगळ्यांच्या भलतीच पसंतीस पडली. ‘देवमाणूस’चं यश पाहता आता याचा पुढील भाग येत आहे. ‘देवमाणूस – मधला अध्याय’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचबाबत सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. याचा प्रोमो नुकताच सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला. (devmanus 3 marathi serial promo)
‘देवमाणूस – मधला अध्याय’ची जिथपासून घोषणा करण्यात आली तिथपासूनच अनेक चर्चा रंगल्या. मुख्य भूमिकेत कोणता अभिनेता दिसणार? याबाबत अनेक तर्क-वितर्क लावण्यात आले. अखेरीस प्रोमोच्या माध्यमातून या मालिकेचा चेहरा समोर आला आहे. प्रेक्षकांचा लाडका ‘देवमाणूस’ म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड मुख्य भूमिका साकारणार आहे. प्रोमोमध्ये त्याचा नवा लूक पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – लग्नाच्या चार वर्षानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, राजेशाही थाटात लेकीचं बारसं, नाव ठेवलं…
‘देवमाणूस’ परत येतोय…
मुख्य म्हणजे ‘देवमाणूस’ या प्रोमोमध्ये डॉक्टरचं काम करताना दिसत नाही. त्याचा नवा व्यवसाय यामध्ये दिसत आहे. किरण शिवणकाम करत आहे. महिलांचे कपडे शिवण्याचे तो काम करत आहे. प्रोमोमध्ये एक महिला त्याच्याकडे कपडे शिवण्यासाठी येते. यावेळी तो म्हणतो, या माप घेतो. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव प्रेक्षकांना थक्क करणारे आहेत.
सरु आजींच्या डायलॉगची हवा
प्रोमोचं आणखी एक मुख्य आकर्षण ठरलं ते सरु आजी. ‘देवमाणूस’च्या पहिल्या दोन भागात सरु आजीच्या बोलण्याची पद्धत प्रेक्षकांच्या खास पसंतीस पडली. आताही प्रोमोमधील त्यांचे संवाद विशेष लक्ष वेधून घेत आहेत. “त्याच्या मड्यावर टाकलं लाल तिखट, या गावात डॉक्टर म्हणून आला, देवमाणूस झाला आणि बायकांची कलमं लावत सुटला. मुडदा परत आला आणि सुटला बायकांना गंडा घालत”. असे सरु आजीचे प्रोमोमधील संवाद चर्चेचे विषय ठरत आहेत. “फक्त सुई बदलली आहे, देवमाणूस तोच आहे” असं म्हणत झी मराठीने या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. तर अनेक सेलिब्रिटींनी किरणला कमेंट्सच्या माध्यमातून शुभेच्छा देत कौतुक केलं आहे.