आपल्या देवाला बघण्याची आणि भेटण्याची सर्वांचीच इच्छा असते. अशीच क्रिकेटच्याही देवाला भेटण्याची अनेकांची इच्छा असते. अर्थात क्रिकेटचा देव म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. सचिन यांना बघण्याची आणि भेटण्याचे अनेकांचे स्वप्न असते आणि हे स्वप्न पूर्ण व्हावे अशी प्रत्येक चाहत्याची इच्छा असते. एका मराठी अभिनेत्याची हीच इच्छा पूर्ण झाली आहे आणि हा अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. अशातच त्याने शेअर केलेला एक फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अभिनेत्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबरोबरचा खास फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Sankarshan Karhade emotional after meeting Sachin Tendulkar)
या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “काय बोलायचं? फक्तं अनुभवायचं. पुण्यात “चितळे परिवाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं निवेदन करायची संधी मिळाली. पाहुणा कोण होता? साक्षात ‘क्रिकेटचा देsssव’. भारतरत्नं सचिन तेंडूलकर. ५ मिनिटं शांतपणे बोलता आलं. ज्या हातांनी १०० शतकं केली तो हातात घेता आला. जे पाय हजारो रन्स काढायला धावले त्यांना स्पर्श करता आला. ‘भारतरत्नं’ असलेल्या ‘सचिन’सोबत २ तास मंचावरती ऊभं राहाता आलं. ज्याच्याकडे अपेक्षेने सगळा हिंदूस्थान बघायचा त्याने त्याची नजर माझ्यावर फिरवली. माझ्या शब्दांत माझ्या भावना ज्या अनेकांच्या मनात आहेत त्या सांगता आल्या अजुन काय पाहिजे? आकाशातल्या देवाsss आभार. तू जमिनीवरचा देव दावला”.
संकर्षणची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे आणि या पोस्टला अनेकांनी लाईकस आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. जितेंद्र जोशी, अमृता खानविलकर, समीर चौघुले यांसारख्या अनेकांनी संकर्षणच्या पोस्टवर कमेंट करत त्याचे कौतुक केलं आहे. दरम्यान, मराठी मनोरंजनसृष्टीतील एक उत्तम, गुणी व चतुरस्त्र कलाकार म्हणून संकर्षण कऱ्हाडेला ओळखले जाते. एक उत्तम अभिनेता, एक उत्तम कवी, उत्तम निवेदक, उत्तम दिग्दर्शक, उत्तम परीक्षक व एक उत्तम माणूस म्हणून तो चांगलाच लोकप्रिय आहे.
संकर्षणच्या अभिनयासह, त्याच्या लिखाणाचे, दिग्दर्शनाचे आणि त्याच्या कवितांचे अनेक चाहते आहेत. विविध क्षेत्रात मुशाफिरी करणारा हा अभिनेता सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो अनेक फोटो व व्हिडिओ शेअर करत असतो. तसंच त्याच्या कामानिमित्तची काही माहितीही शेअर करत असतो. अशातच त्याची ही पोस्ट व्हायरल होत आहे