Aastad Kale Video : सामाजिक मुद्द्यांवर कायमच रोखठोक बोलणाऱ्या आस्तादने एका श्वानाचा चारचाकी गाडीमुळे जीव गेल्याने आवाज उठवला होता. अभिनेत्याच्या बिल्डिंगच्या आवारात ही घटना घडली असल्याचं त्याने नमूद केलं आहे. यावेळी आस्तादने हा प्रकार ज्या व्यक्तीकडून घडला त्याच्या लायन्सन्सचा फोटो, मृत पिलांचा फोटो आणि चारचाकी गाडीचा फोटो शेअर केला होता. अभिनेत्याने याबाबत पोलिसांत तक्रारही दाखल केली. सुरुवातीला या घटनेची तक्रार नोंदवून घ्यायला पोलीस यंत्रणेकडून नकार आला, मात्र व्हिडीओद्वारे त्याने मदतीचा आवाज दिला आणि पोलिसांनी ही तक्रार नोंदवून घेत तक्रार दाखल करुन घेतली आणि पंचनामाही केला.
अभिनेत्याने ही पोस्ट शेअर करत “कृपया मला सांगा की या व्यक्तीवर काय आणि कशी कारवाई केली जाऊ शकते”, असा सवालही विचारला होता. यानंतर आता अभिनेत्याने व्हिडीओ शेअर करत पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानले आहेत. व्हिडीओ शेअर करत आस्ताद म्हणाला, “नमस्कार मी आस्ताद काळे. काल माझ्या सोसायटीमध्ये घडलेल्या भीषण घटनेचा अपडेट द्यायला हा व्हिडीओ मी बनवला आहे. काल पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला समजलं असेल की, आधी पोलीस यंत्रणेने ही तक्रार नोंदवून घ्यायला नकार दिला”.
पुढे त्याने असं म्हटलं की, “यादरम्यान, पाल फाउंडेशन, रोशन पाठकजी आणि सुधीर कुडाळकर यांच्या प्रयत्नांनी हे शक्य झालं. आम्ही सर्व एकत्रच होतो. या प्रकरणाबत काल माझी जबानी घेण्यात आली, आणि एफआयआर नोंदविण्यात आली. त्यानंतर पोलिसांनीही अतिशय उत्तमप्रकारे सहकार्य केलं. एफआयआर हातात आल्यावर पोलीस माझ्या सोसायटीमध्ये आले आणि त्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. रीतसर सर्व झाल्यानंतर आम्ही त्या पिल्लाला घेऊन परळ येथील पशु-पक्ष्यांच्या इस्पितळात ठेवलं. पुढच्या चार-पाच दिवसांत पोस्ट मॉर्टमचा रिपोर्ट येईल. आणि कायद्यानुसार पुढच्या ९० दिवसांत चार्जशीट फाईल केली जाईल, पुढे सर्व कोर्टाच्या हातात आहे”.
आस्ताद आपल्या दमदार अभिनयामुळे व बेधडक वक्तव्यामुळे कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. आस्ताद अभिनय क्षेत्राबरोबरच सामाजिक व राजकीय घडामोडींबाबतही भाष्य करत असतो. बरेचदा आस्तादने भाष्य केलेल्या या पोस्टमुळे त्याला ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला आहे. मात्र या ट्रोलर्सला न जुमानता कायमच अभिनेता आपलं स्पष्ट मत मांडण्यात कधीच कचरला नाही. आस्तादने त्याच्या कलेच्या जोरावर सिनेसृष्टीत आपलं वर्चस्व निर्माण केलं.