ज्यांनी आपल्या विनोदी कलाकृतीने लोकांना खळखळून हसवत मराठी चित्रपटसृष्टी अजरामर केली, ते दिग्गज कलावंत, अभिनेते, निर्माता व दिग्दर्शक दादा कोंडके. आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीतील विनोदासाठी ओळखले जाणारे दादा कोंडके यांच्या अनेक चित्रपटांनी कमाईचे त्याकाळातील अनेक आकडे मोडले. शिवाय तब्बल ९ मराठी चित्रपटांचे रौप्यमहोत्सवी आठवडे साजरे करत ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये आपले नाव नोंदवले व मराठी चित्रपटसृष्टीत सुवर्णकाळ आणला. (Dada Kondke)
लोककलावंत म्हणून कलाक्षेत्रात पदार्पण करणाऱ्या दादा कोंडके यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन केलेलं आहेत. त्यातील १२ चित्रपटांच्या प्रिंटबाबत नुकतेच मुंबई हायकोर्टाने आदेश दिले आहेत. हायकोर्टाचे न्यायधीश रियाझ छागला यांनी २० जुलै रोजी हा निकाल देत ‘बॉम्बे फिल्म एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ यांना दादांच्या १२ चित्रपटांचे प्रिंट ‘एव्हरेस्ट एंटरटेनमेंट एलएलपी’ला देण्याचे आदेश दिले. ज्यात सोंगाड्या, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, बोट लावीन तिथे गुदगुल्या, आली अंगावर, सासरचे धोतर, मुका घ्या मुका अश्या दर्जेदार चित्रपटांचा समावेश आहे. (Dada Kondke movies rights)
काय आहे हे प्रकरण ? (Dada Kondke movies rights)
दादा कोंडकेंच्या मृत्युपत्रानुसार त्यांच्या १२ चित्रपटांचे अधिकार त्यांच्या बहीण लीलाबाई मोरे सून माणिक मोरे यांना दिले होते. त्यांनी तीन बॅनरखाली या चित्रपटांची निर्मिती केली. पुढे दादांच्या निधनानंतर १० ऑगस्ट २०२२ रोजी माणिक मोरे यांनी हे सर्व अधिकार आपल्याला दिले, असे एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचे म्हणणे आहे.

मात्र दादांच्या या चित्रपटांवर आपला हक्क असल्याचा दावा शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठानचे ट्रस्टी हृदयनाथ कडू-देशमुख व अभिनेत्री उषा चव्हाण यांनी केला होता. त्यामुळे या चित्रपटांचे हक्क व मालकी आपल्याला मिळावेत, यासाठी एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने अंतरिम अर्ज दाखल केला होता. त्यावर हायकोर्टाने हा अंतरिम निर्णय देत या सर्व चित्रपटांचे अधिकार एव्हरेस्ट कंपनीला देण्यात आले. त्यामुळे दादा कोंडकेंचे हे १२ दर्जेदार चित्रपट आता प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. (Dada Kondke movies rights)