Amol Naik New Business : अभिनयाबरोबरच अनेक कलाकार असे आहेत ज्यांनी विविध क्षेत्रात आपला जम बसवलेला आहे. अभिनयाची आवड जोपासत अशी अनेक कलाकार मंडळी आहेत ज्यांनी व्यवसायक्षेत्रात नवं विश्व तयार केलं आहे. अशातच आता एका मराठमोळ्या अभिनेत्याने अभिनयाबरोबरच व्यवसायक्षेत्रात पदार्पण केलं असल्याचं समोर आलं आहे. हा मराठमोळा अभिनेता म्हणजे अमोल नाईक. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून अमोल नाईकने बरकत ही भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. झी मराठी वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी ही एक मालिका होय. या मालिकेतून अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.
या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर चार वर्षांहून अधिक काळ अधिराज्य गाजवलं. राणादा, अंजली, बरकत या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात असून कलाकारांना त्यांच्या या भूमिकेतील नावांनीच ओळख मिळत आहे. आता या मालिकेतील बरकतने म्हणजेच अमोलने नव्या व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. याबाबत त्याने स्वतः सोशल मीडियाद्वारे जाहीर केलं आहे. अमोल नेमका कोणता व्यवसाय सुरु करतोय याबाबत त्याने एका व्हिडीओच्या माध्यमातून माहिती दिली आहे. अमोलचा हा व्हिडीओ इंस्टाग्राम अकाउंटवर तुफान व्हायरल होत आहे.
अमोलने हा व्हिडीओ शेअर करत त्याखाली कॅप्शन देत असं म्हटलं की, “नवीन स्टार्ट-अप लवकरच येत आहे. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ”. या व्हिडीओमध्ये त्याने असं म्हटलं की, “नमस्कार मी अमोल नाईक. आज तुमच्यासमोर येण्याचं खास कारण आहे. मी आणि माझी टीम एका नवीन व्यवसायात पदार्पण करतोय. तो व्यवसाय म्हणजे महिलांसाठी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे आपले केस. हे आपले केस अधिक सुंदर कसे बनवता येतील? याकरिता आम्ही तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येत आहे आणि ते काय असणार आहे? हे तुम्हाला लवकरच कळेल”. आता अमोलने नेमका कोणता व्यवसाय सुरु केला आहे, तो प्रेक्षकांसाठी काय नवीन घेऊन येणार आहे हे लवकरच कळेल.
आजवर अमोलने ‘तुझ्यात जीव रंगला’नंतर, ‘दार उघडं बये’, ‘सुंदरी’, ‘संत गजानन शेगावीचे’ या मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तर ‘स्टार प्लस’वरील ‘माटी से बंधे डोर’ या मालिकेतही त्याने काम केलं आहे. सध्या अभिनेता ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.