Paaru Set Safar : ‘झी मराठी’ वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. यापैकी ‘पारू’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. सध्या मालिकेचं चित्रीकरण हे सातारा येथे सुरु असलेलं पाहायला मिळत आहे. त्यामुळे मालिकेच्या चित्रीकरणानिमित्त कलाकार मंडळी घरापासून दुर राहून त्यांच्या कामाला प्राधान्य देत आहेत. मालिकेच्या सेटची सफर नुकत्याच एका व्हिडीओमधून समोर आली. ही सफर पारू म्हणजेच शरयू सोनावणेने करुन दिली. त्यामुळे किर्लोस्करांचा बंगला नेमका कसा आहे हे या व्हिडीओद्वारे पाहायला मिळालं. मालिका सुरु झाली तेव्हापासून किर्लोस्कर बंगला अनेकांच्या पसंतीस पडत होता. अखेर या बंगल्याची सफर समोर आली आहे.
‘पारू’ मालिकेच्या सेटची झलक ‘इट्स मज्जा मराठी’च्या युट्युब चॅनेल वरुन पाहायला मिळत आहे. किर्लोस्कर बंगल्याच्या एका बाजूला डोंगर, आणि एका बाजूला उरमोडी धरण आहे. तर बंगल्याचे रक्षक जॉर्डन व दुश्मन यांचीही पारूने ओळख करुन दिली. भव्य हॉल, अहिल्यादेवींची बसायची जागा, स्वयंपाक घर, आणि मालिकेतील सर्व सदस्यांच्या खोल्या पाहायला मिळत आहेत. भव्य अशा हॉलमध्ये त्यांचं चित्रीकरण होत असतं, सुंदर सोफा, त्यावर रंगीबेरंगी कुशन वर खोल्यांकडे चढून जायला असलेले जिने या सर्व गोष्टींनी या किर्लोस्कर बंगल्याच्या हॉलची शोभा वाढविली आहे. तर हॉलच्या बाजूला अहिल्यादेवी घरातल्या सदस्यांबरोबर गप्पा मारायला बसतात, वा चर्चा करायला बसतात ती जागा आहे.
किर्लोस्करांचं स्वयंपाकघर ही पारूची आवडती जागा आहे. त्यांच्या स्वयंपाकघराचा ताबा हा पारुजवळ आहे. स्वयंपाक घरातील मॉड्युलर किचन व उत्तम मांडणी नेहमीच लक्षवेधी राहिली आहे. तर अहिल्यादेवी किर्लोस्करांच्या खोलीत असणार पुस्तकांचं भांडार खूप खास आहे. अनेकदा अहिल्यादेवी त्यांच्या खुर्चीत बसून पुस्तक वाचताना दिसतात. तर एका बाजूला प्रीतम व आदित्य यांना मिळालेल्या ट्रॉफी आहेत. या खोलीची बाल्कनी खूप सुंदर आहे. कारण या बाल्कनीमधून धरणाचं सुंदर असं दृश्य पाहायला मिळतं. तर आदित्यच्या रुमचीही झलक पाहायला मिळाली.
किर्लोस्करांच्या बंगल्याच्या बाहेर असणारी खूप मोठी ऐसपैस जागा, बाग खूप सुंदर आहे. या बंगल्याची खासियत म्हणजे बंगल्यात बाहेरूनही कोणत्याही खोलीत जाता येतं. बंगल्याच्या आवारात खूप मोठं असं स्विमिंग पूलही पाहायला मिळत आहे. बंगल्याच्या अवती-झाडं-झुडूप, डोंगर पाहायला मिळत आहेत. निसर्गाच्या कुशीत असलेला हा किर्लोस्कर बंगला भव्य आणि लक्षवेधी आहे.