बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी मध्यरात्री अज्ञात हल्लेखोराने हल्ला केला. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या या हल्लेखोराची चाहूल लागताच महिला कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. यानंतर सैफ अली खानने तत्काळ धाव घेतली. हल्लेखोर आणि सैफ अली खान या दोघांमध्ये चांगलीच झटापट झाली. यामध्ये सैफ अली खानवर अनेक वार झाले. यानंतर त्याला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर सैफ अली खान धोक्यातून बाहेर आल्याचे सांगण्यात आले. या संपूर्ण घटनेवरुन आता राजकीय वर्तुळात सत्ताधाऱ्यांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. कायदा सुव्यवस्था आणि गृहमंत्रालयावर टीका केली जात आहे. (Devendra Fadnavis on Saif Ali Khan attacked)
यावर आता मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच कंगना रणौत दिग्दर्शित ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबद्दल बोलताना म्हटलं की, त्याच्यावरील हल्ला ही गंभीर घटना आहे. मात्र त्यामुळे संपूर्ण मुंबई असुरक्षित असे म्हणणे चुकीचे ठरेल असं मत व्यक्त केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “देशाची आर्थिक राजधानी सुरक्षित करण्यासाठी सरकार पावले उचलणार आहे. मला वाटते की, देशातील मोठ्या शहरांमधील मुंबई हे सर्वात सुरक्षित शहर आहे. काही वेळा अशा घटना घडतात हे खरे आहे आणि त्या गांभीर्याने घ्यायला हव्यात. पण अशा घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे, असे म्हणणे योग्य नाही. यामुळे मुंबईची प्रतिमा मलिन होत आहे. पण शहर सुरक्षित करण्यासाठी सरकार नक्कीच प्रयत्न करेल”.
आणखी वाचा – सैफ अली खानच्या लहान मुलावर हल्ला करण्याचा होता प्रयत्न, मागितलेले एक कोटी, कर्मचारीचा धक्कादायक खुलासा
दरम्यान, दरम्यान, पोलिसांनी दरोडा, घुसखोरी आणि गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल केला आहे, परंतु अद्याप संशयितास अटक केलेली नाही. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हे संपूर्ण चोरीचे प्रकरण असल्याचे दिसते. पोलिसांची १० पथके या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यामुळे आता हा तपास कधी पूर्ण होणार? आणि याबद्दलची पुढील माहिती कधी पुढे येणार? याची अनेकजण वाट पाहत आहेत.