Tharla Tar Mag Set : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील नेहमीच चर्चेत असणारी आणि लोकप्रिय मालिका म्हणजे ‘ठरलं तर मग’. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका अगदी पहिल्या दिवसापासून अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळतेय. मालिकेतील कथानकाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. याशिवाय मालिकेतील पात्रही रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. तर सायली -अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. शिवाय कल्पना, पूर्णा आजी, प्रताप, मधुभाऊ, अस्मिता, प्रिया, नागराज यांसारखी अनेक पात्र त्यांच्या भूमिका उत्तम साकारताना दिसत आहेत. सध्या मालिकेत सायली व अर्जुन यांच्यात दुरावा आला असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे दोघेही एकमेकांपासून दूर आहेत.
मालिकेत सध्या असं पाहायला मिळत आहे की, प्रियाने सायली व अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य सर्वांसमोर उघड केल्याने कल्पनासह सुभेदार कुटुंबातील सर्वच सदस्यांना खूप धक्का बसतो. सायली व अर्जुन यांनी विश्वासघात केल्याने दोघेही सगळ्यांच्या मनातून उतरतात. सायलीकडून ही अपॆक्षा नसल्याचं म्हणत कल्पना तिला हाताला धरून बाहेर काढते. तर मधुभाऊही सायलीला घरी घेऊन जातात आणि अर्जुनसाठी त्यांचे दरवाजे कायमचे बंद करतात.
सायली सध्या तिच्या माहेरी म्हणजेच कुसुम व मधुभाऊंबरोबर राहत आहे. अशातच सायली राहत असलेल्या तिच्या माहेरची झलक पाहायला मिळत आहे. ठरलं तर मग मालिकेच्या सेटवर सायलीच माहेर नेमकं कसं आहे याची झलक ‘इट्स मज्जा’ या युट्युब चॅनेलवर दाखवण्यात आली आहे. सध्या सायलीच्या घराचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये जुई स्वतःच तिच्या माहेरच्या जनता चाळीची ओळख करुन देत आहे.
आणखी वाचा – ‘दहावी-अ’च्या पहिल्या एपिसोडला काही तासांमध्येच लाखो व्ह्यूज, प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद
साडीचे पडदे, सुंदर आणि छोटंसं देवघर, मातीची भांडी, चिनी मातीची भांडी, किचनची नीटनेटकी मांडणी असलेलं सुंदर असं सायलीच्या कुसुम ताईचं चाळीतील घर आहे. यावेळी सायलीने चाळीबाहेरच्या खास जागेचीही आठवण करुन दिली. शिवाय सेटवर चाळीतल्या घरी नेमकं कसं शूटिंग केलं जात याची झलकही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.