Sanjana Kale shares video : मालिकांचं शूटिंग कसं होतं याबाबत जाणून घ्यायला प्रेक्षक मंडळी नेहमीच उत्सुक असतात. पडद्यामागे नेमकं काय होतं हे जाणून घ्यायला त्यांना नेहमीच आवडतं. तर बरेचदा कलाकार मंडळीच सेटवरील गमती-जमती, शूटिंगदरम्यानचे किस्से सोशल मीडियावर शेअर करतात. अशातच ‘झी मराठी’वाहिनीवरील ‘पारू’ मालिकेतील अभिनेत्री संजना काळे हिने शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. संजना मालिकेत प्रिया ही भूमिका साकारत आहे. प्रियाने नुकताच मालिकेत शूट झालेल्या आगीच्या सीनमागचा खरा किस्सा सोशल मीडियावर व्हिडीओद्वारे सांगितला.
हा व्हिडीओ शेअर करत प्रिया म्हणाली, “कुठलीच ट्रिक न वापरता खऱ्या साडीला आग लावून हा सीन शूट केला होता. मला खरंच खूप भीती वाटली होती; पण काळजी करु नका. तिथे सगळे प्रोफेशनल लोक होते. काळजीपूर्वक हा सीन केला गेला होता. कॅमेरात दिसू नयेत असे हे चार-पाच लोक आजूबाजूला बसले होते. सरांनी सीन कट म्हटल्यानंतर ते आग विझवण्यासाठी येत होते. आम्ही साडीच्या पदरावर डिझेल शिंपडून आग लावली होती”.
आणखी वाचा – धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हळहळले मराठी कलाकार, भावुक पोस्ट शेअर करत व्यक्त केलं दुःख
“माझ्या साडीला एक्स्टेंशन होते, त्यामुळे रिटेक्सही घेता येत होते आणि आग वाढली असती, तर मला हे एक्स्टेंशन काढून फेकता आले असते. वेगवेगळ्या अँगलने हा सीन शूट केला गेला. या ठिकाणी माझा फक्त चेहरा दिसत होता. त्यामुळे साडीला आग लावण्यात आली नव्हती. साडीच्या पदराचा शॉट होता, तिथे आम्ही आगीचा शॉट घेतला होता. तर अशा प्रकारे आम्ही हा सीन शूट केला आणि ही होती या जखमेमागची स्टोरी”, असं म्हणत भूमिकेतील प्रियाने सीन शूटचा किस्सा सांगितला.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अभिनेत्रीबाबत काळजी व्यक्त केली. अनेक चाहत्यांनी तिला काळजी घेण्याचे आणि असे सीन पुन्हा शूट करु नकोस तसेच सांभाळुन काम कर, असे सल्ले दिले. दरम्यान, मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





