Pooja Birari Kelvan : मराठी मनोरंजनसृष्टीत गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकारांनी आपल्या प्रेमाची कबुली देत लग्नबंधनात अडकणार असल्याची खुशखबर आपल्या चाहत्यांसह शेअर केली आहे. याचबरोबर लोकप्रिय अभिनेत्री पूजा बिरारीच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेची ही नायिका लवकरच बोहल्यावर चढणार असून, ती आदेश-सुचित्रा बांदेकर यांचा लेक सोहम बांदेकरसोबत लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा रंगली होती. शिवाय गणेशोत्सवादरम्यान ती बांदेकरांच्या घरी आरतीसाठी उपस्थित होती, यावेळी पूजाचे व्हिडीओ समोर आले होते. त्यानंतर त्यांच्या या नात्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाला असून पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर हे लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. तर अभिनेत्री पूजा आणि सोहम यांच्या घरी लगीनघाई सुरु झाल्याचं दिसत आहे.
तर काही दिवसांपूर्वीच सोहम बांदेकरच्या लाडक्या सिनेसृष्टीतील मावश्या म्हणजेच अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांच्या जिवलग मैत्रिणींनी मिळून सोहमचं केळवण मोठ्या उत्साहात पार पाडलं होतं. शिल्पा नवलकर, सुकन्या मोने, अभिजीत केळकर, आणि पूर्वा गोखले यांनी मिळून सोहमचे केळवण केले होते. सोशल मीडियावर सध्या सोहमच्या केळवणाचे फोटो देखील व्हायरल झाले होते.

याच दरम्यान, ‘येडं लागलं प्रेमाचं’ मालिकेच्या सेटवर देखील पूजा बिरारीचं केळवण पार पाडण्यात आलं. पूजाचे सेटवरील केळवणाचे फोटो तिचा कॉश्च्यूम डिझायनर तन्मय झंगमने शेअर केले असून, त्यावर त्याने , “आमच्या लाडक्या पूजाचं केळवण” असं कॅप्शन लिहिलं आहे. याशिवाय अभिनेता विशाल निकम आणि सेटवरील अनेक कलाकारांनीही या खास क्षणाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सेटवर झालेलं पूजाचं केळवण सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होताना दिसत आहे.
दरम्यान पूजा बिरारीबद्दल सांगायचे झाल्यास, तिने स्टार प्रवाहवर याआधी ‘स्वाभिमान’ या मालिकेत काम केले होते, ज्यात ती अभिनेता अक्षर कोठारीसोबत मुख्य भूमिकेत झळकली होती. आता ती अभिनेता विशाल निकमसह ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत मंजिरी ही भूमिका साकारत आहे. याआधी तिने झी युवावर ‘साजना’ ही मालिकाही केली होती. तर ‘लक्ष्य’ मालिकेतून अभिनेता म्हणून पदार्पण करणारा सोहम बांदेकर सध्या मालिका विश्वात निर्माता म्हणून सक्रिय आहे. तो सध्या ‘ठरलं तर मग’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकांच्या निर्मितीचे काम पाहतो आहे.





