मराठी सिनेसृष्टीत चित्रपटांची चलती सुरु असताना केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. ३० जून रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाल्यांनतर बरेच दिवस या सिनेमाची सिनेमागृहातील घौडदौड पाहायला मिळाली. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरातून या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळाला. सर्वच स्तरातून या चित्रपटाचं कौतुक होताना पाहायला मिळालं. या सिनेमाने प्रदर्शनाआधीपासूनच प्रेक्षकांमध्ये आपला दबदबा निर्माण केला. (Sukanya Mone On Zee Chitra Gaurav)
सहा बहिणींच्या कथेच्या माध्यमातून ‘बाईपण भारी देवा’ सिनेमाने प्रत्येक स्त्रीला जगण्याचा नवा अर्थ देत स्वतःसाठी जगायला शिकवलं. सिनेमाच्या प्रदर्शनानंतर बॉक्सऑफिसवर सुरु असलेली घोडदौड प्रेक्षकांच्या पसंतीची मोठी पोचपावती ठरली. कथानकाबरोबरच चित्रपटातील कलाकारांचंही भरपूर कौतुक झालेलं पाहायला मिळालं. या चित्रपटात अभिनेत्री सुकन्या मोने, रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा परब या कलाकारांचा अभिनय पाहणं रंजक ठरलं. तसेच चित्रपटाच्या यशात दिग्दर्शक केदार शिंदे यांचा सिंहाचा वाटा आहे.
अशातच नुकत्याच झालेल्या झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात ‘बाईपण भारी देवा’ची हवा पाहायला मिळाली. झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याला सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची टीमही उपस्थित होती. दरम्यान या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. यावेळी सुकन्या मोने, वंदना गुप्ते, शिल्पा नवलकर, दीपा परब, सुचित्रा बांदेकर या कलाकारांनी हजेरी लावली होती.
सुकन्या मोने यांनी पुरस्कारासह टीमचा फोटो शेअर करत एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमद्ये त्यांनी म्हटलं आहे की, “सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार ‘झी चित्र गौरव’ आम्हा सगळ्यांना मिळाला. त्याचप्रमाणे तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांनी जो उत्तुंग प्रतिसाद आम्हाला दिला त्यामुळे ‘झी चित्र गौरव’चा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट पुरस्कार मिळाला. आम्हाला म्हणजेच तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या चित्रपटाला ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाला मिळाला. असेच प्रेम,आशीर्वाद आयुष्यभर आमच्या बरोबर असू देत. कायम. खास करुन तमाम महिलांना मानाचा मुजरा ज्यांनी आम्हाला हा आनंद, हे उत्तुंग यश दाखवलं. आणि हा चित्रपट लोकप्रिय करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला आहे त्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया”.