Nana Patekar retirement : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम फाऊंडेशन’ला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त संस्थेचा दशकपूर्ती समारंभी पुण्यात उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला उपस्थित काही पाहुण्यांशी अनौपचारिक संवाद साधताना नाना पाटेकरांनी त्यांच्या निवृत्तीचे स्पष्ट संकेत दिले आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. नाना पाटेकर हे वयाच्या 13 व्या वर्षापासून काम करत आहेत. त्यामुळे आता काहीतरी वेगळं करायची इच्छा त्यांनी व्यक्त केली. नाम फाऊंडेशनच्या दशकपूर्तीनिमित्त आयोजित या स्नेहमेळाव्यात केंद्रीय रस्ते परिवन आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पद्मभूषण डॉ. विजय भटकर (संगणक शास्त्रज्ञ), उदय सामंत (उद्योग/मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र राज ) आदि मान्यवर मंडळी उपस्थित होती
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना नाना म्हणाले, “रिटायरमेंट असं नाही आहे काय असत आपण त्या खुर्चीला चिकटून बसायचं नाही, तिथून बाजूला व्हायचं आणि आपण दुसऱ्याला, नव्या वक्त्याला संधी द्यायची असते. आता आपल्या घरात आपले वडील असतात, आपण मोठे होऊन नोकरी जरी करत असलो तरी घरातील कर्ता पुरुष हा तोच असतो. तसंच मला जर चुकीचं वाटलं तर मी कान धरेन. छान वाटलं तर पाठ थोपटेन. आणि यासाठी नव्या मुलांना संधी द्यायला हवी”.
पुढे त्यांनी म्हटलं, “मी अजून किती वर्ष, आता मला ७५ वर्ष झाली. त्यामुळे मी रिटायरमेंट म्हणण्यापेक्षा मी उलट म्हटलं की, मी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतून बहुतेक रिटायर होईन. आणि मग मी गावोगावी फिरेन तेसुद्धा फार गरजेचं आहे. तुम्हाला एक फेस वल्ह्यू असते, नट म्हणून तुमचा चेहरा ओळखीचा असतो, लोकांचं तुमच्यावर प्रेम असतं, त्यामुळे त्यांच्याशी तुम्ही पटकन संवाद साधू शकता, त्यांच्या घरातले तुम्ही झालेले असता, हे बाकी इतर कार्यकर्त्यांना फार जड जातं”.
शेवटी नाना नाम फाउंडेशनमधील त्यांचा मुख्य साथीदार अभिनेता मकरंद अनासपुरे बाबत बोलताना म्हणाले, “मकरंद तर गावखेड्यात इतका प्रसिद्ध आहे की सगळी गर्दी त्याच्याभोवती जमा झालेली असते. मी कधी गेलो तर माझ्याकडे कोणी पाहतच नाही त्याला आधी गाठतात. हे नाम फाउंडेशन सुरु झालं ते मकरंदमुळे. तो वयाने धाकटा असला असला तरी खूप थोरला आहे. त्याची मातीशी असलेली नाळ अजून तुटलेली नाही”.





