Womens Day Special : आज वुमन्स डे आहे ना?, चल साजरा करायचा का?, काय हवंय तुला?, काय आणू मी तुझ्यासाठी? असे अनेक प्रश्न कानावर पडू लागले. आणि आपसूक माझ्या तोंडातून निघून गेलं हो वुमन्स डे आहे पण तो आजच का साजरा करायचा?. हा एक दिवस महिलांपेक्षा सुपेरीअर आहे का?, आणि कोणीतरी उरलेले ३६४ दिवस आमच्यावर राज्य करणार?. अरे मुळात प्रश्नच चुकला. सध्याच्या परिस्थितीत या प्रश्नाच्या उत्तरावर किती बोलू आणि कुठून सुरुवात करु सुचत नाहीये. ‘वुमन्स डे’ एकच दिवस साजरा का करायचा?, सगळेच जे प्रश्न मला विचारत होते वुमेन्स डेबद्दल बोलत होते ते मला थोडं खटकलं.
वयात आल्यानंतर आमच्या माथी येतं ते म्हणजे रांधा, वाढा, उष्टी काढा. हे कोणत्याही स्त्रीला आजवर चुकलेलं नाही. तसं तर मोठमोठ्या कंपन्यांमध्ये चांगल्या पोस्टवर असलेल्या महिलांनाही घरात येताच स्वयंपाकघर गाठावं लागतं. तर काही अशा महिला आहेत ज्यांना पोटापाण्यासाठी आणि घर चालवण्यासाठी इतरांच्या घरी जाऊन कामं करावी लागतात, नोकरी करुनही घराची कामं आमच्या वाटेला आहेतच… म्हणजे आमचा रोजच वुमन्स डे नाही का?
बरं, एक स्त्री जेव्हा तिच्या सासरी जाते तेव्हा मुलगी म्हणून तिचा सांभाळ करु असं आवर्जून सांगितलं जातं. हो असं असलं तरी ती सून आहे हे विसरुन चालायचं नाही. आणि कालांतराने याचे अनुभवही प्रत्येकीच्या वाट्याला येत असतात. मग सासूचे टोमणे, सासऱ्यांची चिडचिड, नवऱ्याचं… काय बोलणार. शेवटी एक महिला या घरात परकी ती परकीच. अशा रोजच्या त्रासाला सहन करणं म्हणजे आमचा रोजच वुमन्स डे नाही का?
आपल्या संस्कृतीत तर स्त्रीरुपी देवी मातेचं पूजन करतात. आणि आमच्याकडे… पुरुषाच्या त्या नजरेला त्या देवीची भीती वाटत नसेल का?. आताचीच घटना म्हणजे स्वारगेट रेप केस. २६ वर्षीय मुलीवर नराधमाने केलेला अत्याचार. हो. त्यात त्या मुलीचीच चूक हा. कारण पहाटेच्यावेळी तिने सरकारच्या ५०% सवलत असलेल्या यंत्रणेचा लाभ घ्यायचा ठरवला. तर याहून चर्चा रंगली ती म्हणजे नराधमाच्या तावडीतून सुटण्यासाठी तिने काहीच आवाज केला नाही. ती व्यक्ती तिच्या जीवावर उठली असताना तिने आवाज करायला हवा होता ही चूक तिचीच… पुरुषांच्या चुका झाकण्यासाठी कायम स्त्रीला अपराधी ठरवलं जातं, मग असा अपराध सहन करणाऱ्या स्त्रीचा रोजच वुमन्स डे नाही का?
आजही स्त्री जन्म घेऊन भीती वाटते जगायला. कधी कधी वाटत आम्ही आमच्याच घरात सुखरूप आहोत का?, आजकाल तर काय विचित्रच ऐकायला मिळतंय. घरात वडिलांनीच मुलींवर अत्याचार केला, तर कधी काय नवऱ्याने दगडाने ठेचून पत्नीचा जीव घेतला. तर कधी काय सासरच्यांनी हुंड्यापायी सूनेला बाहेरचा रस्ता दाखवला. हो. हेच काय याहून भयानक ऐकायला मिळतं. मुलाच्या जन्मापासून त्याचं कौतुक होतं पण मुलगी झाली म्हटलं की नाक मुरडलंच. मग तेव्हापासूनच प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील स्ट्रगल सुरु झाला म्हणून समजावं, अशा रोज स्ट्रगल करणाऱ्या स्त्रीचा रोजच वुमन्स डे नाही का?
आम्ही परिधान केलेल्या कपड्यानुसार बदलणारे माणसाचे विचार यातही आमचीच चूक. घराबाहेर अधिक काळ म्हणजे रात्री फिरलं आणि चुकून एखाद्याची नजर आमच्यावर पडली तर आम्ही रात्रीचे बाहेर आहोत याचा आम्हालाच दोष. तोकड्या कपड्यांमुळे होणाऱ्या अत्याचारानंतरचे प्रश्न हे स्त्रीवर उठवले जातात. अरे सरकारच्या लाडक्या बहिणीकडे पडणाऱ्या विकृतांच्या नजरेलाही आमचीच चूक. कपड्यांमुळे नेहमीच नजरेत भरणाऱ्या स्त्रीचा रोजच वुमन्स डे नाही का?
आणखी वाचा – Video : अशोक सराफांचा पत्नीला वाकून नमस्कार, ‘त्या’ कृतीने उपस्थितही भावुक, व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव
मासिक पाळीदरम्यान मेडिकलवाला सॅनिटरी पॅडही कागदात गुंडाळून देतो, हे आमच्यासाठी किती वेदनादायक आहे. ते चार-पाच दिवस आम्ही शारीरिक आणि मानसिक दृष्ट्याही कोलमडतो रे. यावेळी खरंतर आधाराची गरज असते पण इथे हात लावू नकोस, हे करु नकोस अशा बंधनाने कुठेतरी लांब पळून जावं असं वाटतं. या नैसर्गिक गोष्टीनेच तुमचा वारसा चालवला जातो त्यातही आमचीच चूक का?. प्रत्येक महिन्यातून या मासिक पाळीच्या दिवसांत होणारा शारिरीक त्रास म्हणजेच स्त्रीचा वुमन्स डे नाही का?…
इतकं सगळं असताना आज खरंच करायचा का वुमन्स डे साजरा?, शाळा-कॉलेजच्या दिवसांत मलाही वुमन्स डेच अप्रूप होतं. हो कारण वुमन्स डेच्या अगदी दुसऱ्याच दिवशी माझा वाढदिवस असतो. त्यामुळे दोन-दोन केक कापायला मिळायचे आणि गिफ्ट्सही दोन… पण आता परिस्थिती बदललीय. जसजसे मोठे होत गेलो तसतशा गोष्टी आपसूक बदलत गेल्या आणि माझ्या मनातील वुमन्स डेची जागाच नाहीशी झाली…