सिनेसृष्टीतील कलाकारांच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. दरम्यान कलाकार मंडळीही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी कायमच चाहत्यांसह शेअर करत असतात. सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री आहे. ‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली. हिंदी मालिकेनंतर प्रार्थना मराठी चित्रपटसृष्टीकडे वळाली. ‘जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा’ या चित्रपटातून प्रार्थना प्रेक्षकांच्या समोर आली. यानंतर ‘मितवा’, ‘कॉफी आणि बरंच काही’ अशा अनेक चित्रपटांत उत्तम काम करत तिने प्रेक्षकांना आपलसं केलं.(Prarthana Behere on her pregnancy)
झी मराठी वाहिनी वरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील नेहा या भूमिकेमुळे ती घराघरांत पोहचली. प्रार्थना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिच्या सुंदरतेने मनमोहक अदांनी ती नेहमीच चाहत्यांना भुरळ घालते. प्रार्थना बऱ्याच वेगवेगळ्या आऊटफिटमध्ये फोटोशूट करत असते. प्रार्थनाचा पती दिग्दर्शक अभिषेक जावकर आहे. २०१७ साली प्रार्थना आणि अभिषेक विवाहबंधनात अडकले. प्रार्थनाला अनेकदा ‘तू आई कधी होणार?’ असा प्रश्न विचारला जातो.
सुबोध भावे यांच्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात प्रार्थनाने हजेरी लावली होती. तेव्हा प्रार्थनाला प्रश्न विचारण्यात आली की, पडद्यावर आईची भूमिका उत्तम निभावते. पण खऱ्या आयुष्यात आई कधी होणार? तेव्हा प्रार्थनाने या प्रश्नाला उत्तर देण्यास टाळाटाळ केली. ती म्हणाली, “माझ्या सासूबाई पण हा शो बघत आहेत. तर नको ना हा प्रश्न. मी चांगलं काम नाही का करत? असं सगळं झाल्यावर मला काम नाही करता येणार’.
पुढे ती म्हणाली, “मला आधीच खूप बाळं आहेत. माझ्याकडे पाच कुत्रे, १२ घोडे, दोन उंदीर. माझ्या नवऱ्याने दोन पांढरे उंदीर पाळले आहेत. आमच्या ऑफिसमध्ये खूप काळे उंदीर होते त्यामुळे आम्ही पांढरे उंदीर पाळले. असं म्हणतात की, काळे उंदीर जिथे असतात त्यांच्या समोर पांढरे उंदीर ठेवले की ते पळून जातात. प्राण्यांना त्रास झालेला मी बघू शकत नाही. मी माझ्या लहान पिल्लांबरोबर खूश आहे म्हणून मला आता मुल नको’. प्रार्थनाने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर दिलं होतं.