आपल्या दमदार अभिनयाने व निखळ हास्याने मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वात आपली छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी. त्यांनी विविध भूमिका साकारत सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली. लहान मुलांच्या ‘सोनपरी’ म्हणून असो किंवा महिलावर्गाच्या अवंतिका असोत त्यांनी प्रत्येक भूमिका अजरामर केली आहे. दूरदर्शनवरून ‘स्वामी’ या मालिकेतून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि आज त्या उत्कृष्ट अभिनेत्री आहेतच पण एक दिग्दर्शिका म्हणूनही त्यांनी स्वतःती ओळख निर्माण केली. एकेकाळी पुण्याहून मुंबईत प्रवास करत या क्षेत्रात सुरूवात करणाऱ्या मृणालने मुंबईनगरीत स्वतःचं घर उभारलं आहे.(Mrunal Kulkarni home tour)
मृणाल यांची अभिनय क्षेत्रातली सुरुवात खऱ्या अर्थानं त्यांच्या लग्नानंतर झाली. वयाच्या १९व्या वर्षी लग्न झाल्यानंतर त्यांनी करिअरचा आरंभ केला आणि पुढे पुणे मुंबई पुणे असा प्रवास सुरु झाला. अगदी विराजस पोटात असतानासुद्धा त्यांनी कामं केली होती. अभिनय क्षेत्र मुंबईतच असल्याने त्यांना पुण्यातून मुंबईत येणं भाग होतं. सगळ्या कुटुंबाची जबाबदारी सासूबाईंनी स्वतः सांभाळत त्यांना कलाक्षेत्रात वाटचाल करण्याची परवानगी दिली. पुढे मृणाल यांनी या क्षेत्रात उडी घेतली. मुंबईत राहण्याची सोय नव्हती. त्यामुळे दादरच्या एका हॉटेलमध्ये रुम घेऊन त्यांनी शहरात पाय रोवायला सुरुवात केली. आणि हळूहळू त्या आज मुंबईत घर घेण्यापर्यंत पोहोचल्या.
त्यांच्या मुंबईतील घराची गोष्ट जाणून घ्यायला चाहत्यांना नक्की आवडेल.कसं आहे सोनपरी म्हणजेच मृणाल यांचं घर? मृणालच्या घराची सजावट त्यांनी स्वतः व त्यांच्या सुनेने अर्थात शिवानीने केली आहे. अगदी जशा मृणाल आहेत तसं त्यांनी आपलं घर सजवलं आहे. नितळ पांढऱ्या रंगाच्या भिंती त्याला साजेसं फर्निचर, खुप सुंदर वस्तूंची मांडणी अशा सगळ्या गुणांनी साजेसं असं त्यांनी आपलं घर सजवलं आहे. मृणाल यांच्या घरात अजून एक गोष्ट सगळ्यांना आकर्षित करेल ती म्हणजे पुस्तकं.
नवरा वकिल, मुलगा कलाकार व आता सूनही कलाकार असल्यामुळे सगळ्यांसाठीच पुस्तक म्हणजे एक प्रकारे खजिनाचा आहे. त्यामुळे त्यांच्या घरात पुस्तकांसाठी विशेष जागा केलेली आहे.सध्या मृणाल ‘सुभेदार’ चित्रपटामुळे विशेष चर्चेत आहे. त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. सोशल मीडियावरही त्यांच्या चित्रपटाचं कौतुक केलं जात आहे.