मराठीला ऑस्कर मिळेल अशी रेसिपी आहे का कोणाकडे?

Marathi movies and oscar
Marathi movies and oscar

आपल्याकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटसृष्टीत तेलगू चित्रपटसृष्टीने एकाच वेळेस दोन ऑस्कर पुरस्कार प्राप्त करुन बाजी मारल्यापासूनच मराठी चित्रपट कधी ऑस्कर पटकावणार ( की नाही? की फक्त चर्चा करीत राह्यचे हेही त्यात ) याची चर्चा सुरु झालीय. तुमचीही काही खेळकर / खोडकर/ बोचरी/ तिरकी वगैरे मते असतीलच यावर. आपण काय गप्प बसणार आहोत काय? मराठीला अद्याप ऑस्कर नाही म्हणजे काय? आम्ही वर्षभरात शे दीडशे चित्रपट काढतो ते उगीच काय? वगैरे …खरं तर तेलगू चित्रपटाला नव्हे तर ‘एका’ गाण्याला आणि लघुपटाला ऑस्कर पुरस्कार प्राप्त झालाय. (Marathi movies and oscar)

चित्रपटाला असता तर …. जाऊ देत. म्हणजे, त्यांच्यासह देशातील सर्वच भाषेतील चित्रपटांना ऑस्कर पुरस्कारासाठी अजून थांबावे लागेल. ते किती अमर्याद काळ असेल हे कोणताही फिल्मी ज्योतिषी कधीच सांगू शकत नाही. अमूकच चित्रपट हिट होईल हे सांगता येत नाही त्याहीपेक्षा ऑस्कर कोणाला मिळेल हेही सांगता येत नाही. आणि येऊही नये यातच गंमत आहे.

या चित्रपटांनी गाठली होती ऑस्करची वेस(Marathi movies and oscar)

आपल्याला फार फार आपुलकीतून, आस्थेने, प्रेमाने वाटतेय, मराठी चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार प्राप्त व्हावा. ‘श्वास ‘, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘कोर्ट ‘ हे पहिल्या फेरीत बाद झाले ( त्यांना विदेशी चित्रपट विभागात नामांकन प्राप्त झाले नाही) ते पुन्हा पुन्हा सांगण्यापेक्षा भविष्यात काय करता येईल हे महत्वाचे. सारखं सारखं ‘ते दिवसच काय होतं’ असे मागे वळून बघणे आजच्या डिजिटल पिढीला नेहमीच आवडत नाही. कधी तरी पिठलं भाकरी कांदा ठीक हो.

एखाद्या जबरदस्त गीत संगीत व नृत्याला ऑस्कर प्राप्त होतोय तर त्यासाठी आपण प्रयत्न करु शकतो. करायलाच हवा. गीत संगीत नृत्य आपली जान आहे. तुम्हालाही माहित्येय, ‘सैराट’चे झिंग झिंग झिंगाट गाणे सुरु होताच पब्लिक आपली खुर्ची सोडून पडद्यासमोर येऊन बेफान होऊन नाचत, त्यात तुम्हीही असाल, (नाचणे माणसाला फ्रेश करते) ‘नाटो नाटो ‘शी याची तुलना करावी की नाही हा वेगळा विषय होईल. पण अशा एकाद्या गाण्यासाठी आपण ऑस्कर पुरस्कारासाठी प्रवेश घेऊन पुरस्कार पटकावू शकतो. आपल्या लोकप्रिय गाण्याचा हायपाॅईंट चित्रपट महोत्सव अर्थात ग्लॅमरस इव्हेन्टस असतो. मग पडद्यावर एकीने साकारलेले गाणे इव्हेन्टसमध्ये कोणीही साकारते आणि भारी काम केले असे वाटते.

‘नटरंग’ मधील वाजले की बारा आणि अप्सरा आली या फक्कडबाज लावण्या मराठीतील जवळपास सर्वच अभिनेत्रींनी आलटूनपालटून कोणत्या ना कोणत्या लहान मोठ्या नि दूरदूरच्या, अगदी विदेशातीही साकारलीत. आणि आजही प्रत्येक इव्हेन्टसमध्ये ही गाणी हुकमी ठरतील. याबाबत फ्री लान्सिंग मामला असतो. आता कोणी म्हणते, नाटो नाटो या एका गाण्याचे बजेटच एवढं भारी, तसं मराठीला कसे परवडणार? अहो, ‘वेड ‘ चित्रपट ७५ दिवसात ७५ कोटी अशी घसघशीत कमाल कमाई करतो ( हा आकडा त्यांनीच सोशल मिडियात दिलाय) याचाच अर्थ मराठीला तेवढं मार्केट निश्चित आहे. त्या गणितानुसार बजेट वाढवले तर? प्रश्न मनात तर आहेच. पण एवढ्यावरच न थांबता ही चौकट मोडून चला ऑस्करला. मराठीत नाटू नाटूसारखी भारी गाणी आहेत नि येतीलही. नक्कीच बनतील. तसं टॅलेंट आपल्याकडे आहे.

====

हे देखील वाचा- नाटू नाटू…. छे, छे नाचो नाचो

====

वेशभूषाकार सुद्धा या यादीत असतात(Marathi movies and oscar)

ऑस्करमध्ये वेशभूषाकाराला पुरस्कार आहे आणि रिचर्ड ॲटनबरो दिग्दर्शित ‘गांधी'(१९८३) साठी तो भानू अथ्थय्या यांनी पटकावला. या पुरस्कारात चरित्रपट आणि ऐतिहासिक चित्रपटाचा जास्त विचार होतो, होऊ शकतो असे म्हटलं तर मराठीत चरित्रपट आणि ऐतिहासिक चित्रपट यांचे प्रमाण पुन्हा वेगळे सांगायलाच नको. अशा चित्रपटात कला दिग्दर्शन, वेशभूषाकार व रंगभूषाकार अतिशय महत्वाचे. ते कलाकाराचे मूळ व्यक्तीमत्व बदलून टाकतात, चित्रपटाला थीमनुसार ‘चेहरा’ देतात.या विभागातही आपण ऑस्कर पटकावू शकतो.चित्रपट माध्यमातील प्रत्येक विभागासाठी ऑस्कर आहे. आणि त्यात हायपाॅईंट चित्रपट.

मराठी चित्रपट ऑस्कर पटकावू शकतो काय या प्रश्नात शंका उपस्थित होते की अपेक्षा? त्यात थट्टा असते की इच्छा? मराठी रसिक मनाला मनोमन वाटतं , मराठी चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार प्राप्त व्हावा. आपल्यात तेवढं टॅलेंट आहे. त्यात त्याचे कदाचित भाबडेपण असेल, त्यात त्याचा भाबडा स्वप्नाळूपणा असेल. असे काहीही वाटलं तरी जुन्या नव्या मराठी चित्रपटावर, कलाकारांवर स्वतःपेक्षाही बेहद्द प्रेम करणारा खूपच मोठा वर्ग महाराष्ट्रासह जगात जेथे जेथे मराठी माणूस आहे तेथे तेथे नक्कीच आहे.

याच रसिकांच्या सदिच्छा, प्रेम, आशीर्वाद यांच्या जोरावर मराठी चित्रपट एक दिवस नक्कीच ऑस्कर पुरस्कार प्राप्त करेल आणि त्या दिवशी मराठी समाजात होळी, दिवाळी, पाडवा, दसरा असे सगळेच एकाच वेळेस असेल. अनेक शहरांत विजयी मिरवणूक निघेल. पण हा सुखद योग कधी आणि कसा येईल? ऑस्कर पुरस्कार प्राप्त होईल अशा क्लासचा हुकमी चित्रपट निर्माण होईल अशी रेसिपी उपलब्ध नाही.

ऑस्कर साठी काय गरजेचं आहे?

खरं तर ‘चांगला चित्रपट हमखास निर्माण होईल ‘ अथवा ‘सुपर हिट चित्रपट पडद्यावर येईल ‘ असा हुकमी फाॅर्मुला नाही. आणि हीच तर या व्यवसायाची गंमत आहे. तरी आपल्याला चांगला वाटतोय तो चित्रपट ऑस्करसाठी आपण पाठवत राहणे हाच प्रयत्नवाद योग्य वाटतो. समजा, भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून आपला मराठी चित्रपट ऑस्करला जात नसेल तर आपण स्वतंत्रपणे प्रवेश घेऊन स्पर्धेत भाग घेऊ शकतो हे निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘मी वसंतराव ‘ या चित्रपटाने अधोरेखित केले आहे. एक दिशा दिली आहे.

आता असा प्रयत्न करायचा तर वेळ, पैसा व शक्ती खर्च होणारच. अमेरिकेत जाऊन ऑस्करची प्रक्रिया समजून घेणे, ऑनलाईन प्रयत्न करणे असे अनेक घटक आहेत. ( तो विषयच वेगळा). पण मोठी स्पर्धा जिंकायची तर त्याच मोठ्या ध्येयापर्यंत जाण्यास बहुस्तरीय मेहनत आलीच. सहजासहजी ऑस्कर प्राप्त झाल्यास त्यात थ्रीलही नाहीच म्हणा.

ऑस्कर लवकरच शंभर वर्षांचे होईल ( यंदाचे ९५ वे वर्ष होते) तोपर्यंत आशयदृष्ट्या मराठी चित्रपट अन्यभाषिक चित्रपटांपेक्षाही सरस आणि सकस असतो, शंभर नंबरी सोने असतो हे जगभरातील चित्रपट जगताला ‘दाखवून’ देण्याचा मार्ग ऑस्कर पुरस्कार प्राप्तीतून जातोय तेव्हा ते मिळायला हवेच. हे एकच यश अनेक शंकेखोर, टीकाकार यांची तोंडे कायमची बंद करेल. एक सहज आठवण म्हणून सांगतो, ‘श्वास ‘(२००३) च्या अगोदरच्या काळात ‘मराठी चित्रपटाला कसला हो ऑस्कर पुरस्कार प्राप्त होतोय ‘ असा थट्टेचा सूर असलेला परिसंवाद मुंबई, पुणे, ठाणे येथे झाला. पण ‘श्वास ‘ची ऑस्करसाठी निवड होताच हा परिसंवाद हद्दपार झाला. यशाची ताकद अशी असते. चित्रपटाच्या जगात यश हेच चलनी नाणे अथवा ब्रॅण्ड असतो तो हा असा….

लेखक: दिलीप ठाकूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *