छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘आई कुठे काय करते’. टीआरपीच्या शर्यतीतही या मालिकेने स्वतःच स्थान टिकवून ठेवलं. मालिकेत आलेल्या रंजक वळणांनी या मालिकेची लोकप्रियता वाढत गेली. अरुंधती या पात्राभोवती फिरणाऱ्या मालिकेच्या कथानकाने या मालिकेची घडी घट्ट बसवली. अस असलं तरी मालिकेत असे काही टर्न अँड ट्विस्ट आले ज्यामुळे ही मालिका नेटकऱ्यांच्या कचाट्यात सापडली. (Aai Kuthe Kay Karte Serial Troll)
घटस्फोट व ‘आई कुठे काय करते’ हे एक समीकरणचं झालं आहे. मालिकेत एकामागोमाग एक दाखवण्यात आलेल्या घटस्फोटांवरून मालिकेची कथा फिरवण्यात आली. सुरुवातीला मालिकेत अरुंधती आणि अनिरुद्ध यांचा घटस्फोट दाखवला, त्यांनंतर संजना व तिच्या पतीचा घटस्फोट झाला. संजनाचा घटस्फोट होताच तिने अनिरुद्धंसोबत लग्न केलं. यशची होणारी पत्नी गौरी त्याला लग्न होण्याआधीच सोडून गेली. आणि आता मालिकेत विशाखा आणि तिच्या नवऱ्याचा घटस्फोट दाखवण्यात येणार आहे. घटस्फोटावर फिरवण्यात आलेलं कथानक प्रेक्षकांना काहीस आवडलेलं नाही.
पाहा नेटकऱ्यांनी ‘आई कुठे काय करते’ मालिकेवर का संताप व्यक्त केला आहे (Aai Kuthe Kay Karte Serial Troll)
“घटस्फोटाशिवाय मालिकेत दुसरं काही दाखवता येत नाही का? की लेखकाला दुसरं काही सुचत नाही?” असं म्हणत नेटकऱ्यानी कमेंट करायला सुरुवात केली आहे. दुसऱ्या एका युझरने लिहिलं, ‘प्रेक्षक इतकं बोलतायत, कथेच्या नावाने बोंबा मारतायत तरीही हे काही मालिकेचा ट्रॅक बदलायला तयार नाहीत.’ तर आणखी एका नेटकऱ्याने संतापून म्हटलंय, “आता पुढची कथा अशी दाखवा की आप्पांचं बाहेर अफेअर आहे आणि नंतर कांचन आणि त्यांचा घटस्फोट दाखवा. म्हणजे तुम्हीही मोकळे आणि आम्हीही.” यावरूनच एकंदरीत प्रेक्षक मालिकेच्या सध्याच्या कथेवर नाराज असल्याचं दिसून येतं आहे.

आता प्रेक्षकांनी या मालिकेला ट्रोल केलं असून मालिकेत पुढे कोणती वळण येणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.