Suhasini Deshpande Death : मराठी मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं दुःखद निधन झालं आहे. त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्काच बसला आहे. सुहासिनी देशपांडे यांनी वयाच्या १२ वर्षांपासून कला क्षेत्रात कामाला सुरुवात केली. इतक्या वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी १०० हून अधिक चित्रपटात उल्लेखनीय भूमिका केल्या आहेत. आपल्या दमदार अभिनय कौशल्यानं त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. मात्र त्यांच्या जाण्याने मराठी व हिंदी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. उद्या (बुधवार, २८ ऑगस्ट) रोजी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. Suhasini Deshpande Passed Away)
सुहासिनी देशपांडे यांनी ‘देवकीनंदन’ ‘गोपाला’, ‘वारसा लक्ष्मीचा’, ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’, ‘पुढचं पाऊल’, ‘आज झाले मुक्त मी’, ‘धग’, ‘माहेरचा आहेर’, ‘गड जेजुरी’, ‘आम्ही दोघे राजा राणी’, ‘बाईसाहेब’, ‘मानाचं कुंकू मानाचा मुजरा’ यांसारखे अनेक मराठी चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. रंगभूमीवरील कार्याबद्दल सुहासिनी देशपांडे यांना २०१५ साली अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या पुणे शाखेतर्फे जयंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

तसेच रंगभूमीशी त्यांचं अतूट नातं होतं. मराठी रंगभूमीवर त्यांनी अनेक लोकप्रिय नाटकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. ‘तुझं आहे तुझ्या पाशी’, ‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘बेल भंडार’, ‘सुनबाई घर तुझंच आहे’, ‘राजकारण गेलं चुलीत’, ‘चिरंजीव आईस’, ‘सासूबाईंचं असंच असतं’ व ‘लग्नाची बेडी’ अशा नाटकांचे हजारो प्रयोग त्यांनी केले आहेत.
मराठीबरोबर त्यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले. २०११ मध्ये त्या रोहित शेट्टीच्या ‘सिंघम’मध्ये दिसल्या होत्या. ‘सिंघम’ हा सुहासिनी यांचा शेवटचा हिंदी चित्रपट होता. या चित्रपटात त्यांनी काजल अग्रवालच्या (काव्या)च्या आजीची भूमिका साकारली होती. दरम्यान, सुहासिनी देशपांडे यांच्या निधनामुळे मराठी मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली असून त्यांच्या निधनाच्या वृत्तावर अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे.