Vijay Kadam Died : ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन झाले असल्याची बातमी समोर आली आहे. अनेक दिवसांपासून विजय कदम हे कर्करोगाशी झुंज देत होते. अखेरीस त्यांची ही कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली आहे. विजय यांनी त्यांच्या राहत्या घरीच अखेरचा श्वास घेतला. विजय यांनी कर्करोगामुळे वयाच्या ६७ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी पद्मश्री व मुलगा गंधार कदम हे आहेत. त्यांच्या पार्थिवावर ओशिवरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विजय कदम यांच्या निधनाच्या बातमीनंतर संपूर्ण कलासृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मराठी सिनेसृष्टीने एक हरहुन्नरी कलाकार गमावला असल्याची भावना सिनेसृष्टीच्या कलाकारांनी व्यक्त केली आहे. आज अंधेरी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. विजय कदम यांच्या निधनाच्या बातमीनंतर सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींनी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिलेली पाहायला मिळत आहे.
विजय कदम यांच्या निधनावर चाहते व सेलिब्रिटीदेखील शोक व्यक्त करत आहेत. अभिनेते सुनील तावडे यांनी विजय कदम यांचा फोटो शेअर करत “भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा”, असं कॅप्शन देत पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर सचिन गोस्वामी, विशाखा सुभेदार यांनी देखील विजय यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. “गेले पण विसरणार नाही. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो”, असं म्हणत अभिनेत्री अश्विनी भावे हिने देखील विजय यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

तर मानसी नाईक, पुष्कर जोग, प्रसाद ओक या कलाकारांनीही दुःखद बातमी म्हणत श्रद्धांजली वाहिली आहे. “माझा मित्र विजय कदम याच्या आत्म्यास शांती लाभो असं म्हणणंही कठीण वाटत आहे”, असं म्हणत अजिंक्य देव यानेदेखील श्रद्धांजली वाहिली आहे. मराठी सिनेसृष्टीने एक हरहुन्नरी कलाकार गमावला असल्याची भावना प्रत्येकजण व्यक्त करताना दिसत आहे. अनेक कलाकार विजय यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करताना दिसत आहेत.