बऱ्याच दिवसांपासून केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ चित्रपट येणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. शिवाय चित्रपटाच्या टीझरनेही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. मात्र पोस्टरवर दाखवण्यात आलेली व्यक्ती पाठमोरी असल्याने गडकरी यांची भूमिका कोण साकारणार हे गुलदस्त्यात ठेवण्यात आलं होतं. अशातच नितीन गडकरी यांची भूमिका कोण साकारणार, हे गुपित समोर आलं आहे. (Rahul Chopda Played Role In Gadkari Movie)
‘गडकरी’ चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये एक व्यक्ती पाठमोरी उभी होती आणि त्या व्यक्तीने हातात हात घातला होता. त्यामुळे ही व्यक्ती नेमकी कोण आहे, हे ओळखणं कठीण होऊन बसलं होतं. आता मात्र ही भूमिका कोणता कलाकार साकारणार याचा उलगडा झाला आहे. त्यामुळे साऱ्या प्रेक्षक वर्गात या चित्रपटाला घेऊन उत्सुकता पाहायला मिळतेय.
अखेर या चित्रपटात नितीन गडकरींची भूमिका कोण साकारणार, हे समोर आलं आहे. अभिनेता राहुल चोपडा या चित्रपटात नितीन गडकरी यांची भूमिका साकारणार आहे. नुकतंच या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित झाले. त्यात गडकरींची भूमिका साकारणाऱ्या राहुल चोपडाचा पहिला लूक समोर आला आहे. सामान्य नागरिकांसाठी असामान्य कार्य करणाऱ्या या नेत्याला जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. यापूर्वी या चित्रपटाचे पोस्टर, टिझर प्रदर्शित केल्यानंतर प्रेक्षकांना उत्सुकता होती ती, नितीन गडकरी यांची भूमिका कोण साकारणार याची. आता या प्रेक्षकांच्या उत्सुकतेला पूर्णविराम मिळाला असून चित्रपटाचे दुसरे पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून ‘गडकरी’ यांची भूमिका राहुल चोपडा साकारणार असल्याचं समोर आलं आहे. तर त्यांच्या पत्नीची म्हणजेच कांचन गडकरी यांची भूमिका ऐश्वर्या डोरले साकारणार आहे.
या व्यतिरिक्त या चित्रपटात नितीन गडकरी यांच्या मित्रांच्या भूमिकेत अभिलाष भुसारी, पुष्पक भट, अभय नवाथे, वेदांत देशमुख ही कलाकार मंडळी दिसतील. तर पत्रकाराची भूमिका तृप्ती प्रमिला केळकर हिने साकारली आहे. अनुराग राजन भुसारी दिग्दर्शित ‘गडकरी’ हा चित्रपट येत्या २७ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ‘ए.एम सिनेमा’ आणि अभिजीत मजुमदार प्रस्तुत, ‘अक्षय देशमुख फिल्म्स’ निर्मित ‘गडकरी’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.