बॉलिवूडमधील प्रसिद्ध विनोदी अभिनेते टिकू तलसानिया यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. ‘अंदाज अपना अपना’, ‘कुली नं. १’, ‘इश्क’, ‘हंगामा’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांना मनमुरादपणे हसवलं आहे. त्यांनी आपल्या ३९ वर्षांच्या कारकिर्दीत विविध भाषांमधील तब्बल २०० हून अधिक चित्रपट केले असून ते शेवटचे रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ चित्रपटात दिसले आहेत. मात्र, एकेकाळच्या या लोकप्रिय अभिनेत्याला सध्या काम मिळत नाही. (Tiku Talsaniya talks about rejecting in auditions)
अभिनेते टिकू तलसानिया यांनी नुकताच ‘इंडियन एक्सप्रेस’ला मुलाखत दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी काम मिळत नसल्याची खंत बोलून दाखवली आहे. ते सध्या विविध ठिकाणी ऑडिशन्स देत असले, तरी त्यांना वारंवार अनेकांकडून नकाराचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर ते असेही म्हणाले की, आज सिनेसृष्टी जितकी झपाट्याने प्रगती करत आहे. तेव्हा या परिस्थितीत ते स्वतःला सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. ते यावेळी म्हणाले, “मी सध्या बेरोजगार असून चांगल्या भूमिकेच्या शोधात आहे. त्यासाठी मी ठिकठिकाणी ऑडिशन्स देत असलो, तरी मला यामध्ये यश मिळत नाही.”
ते पुढे म्हणाले, “मी गेल्या अनेक वर्षांपासून गुजराती रंगभूमीवर सक्रिय आहे. माझ्या करिअरची सुरुवातच गुजराती नाटकांपासून झाली होती. आजच्या घडीला जर कोणी माझ्याकडे कामासाठी येत असेल तर मी त्याला नकार देत नाही. तर त्यांच्याबरोबर पुढे जाण्याचा विचार करतो. पण आता मला काही काम मिळत नसून माझ्यासाठी काम शोधणे कठीण होत चालले आहे.”
हे देखील वाचा – “तिच्या मनात काय आहे याचं…”, ‘सूर नवा ध्यास नवा’मुळे स्पृहा जोशीबरोबर होणाऱ्या तुलनेवर स्पष्टच बोलली रसिका सुनील, म्हणाली, “आताच्या कलाकारांना…”
टीव्ही आणि चित्रपटांपासून दूर राहण्याबद्दल ते म्हणाले की, “मी चित्रपट किंवा टीव्हीपासून दूर गेलेलो नाही. मात्र, मी अशा भूमिकेच्या शोधात आहे ज्यात मी फिट होऊ शकेन. मी अजून या क्षेत्रातून निवृत्ती घेतली नाही. पण भूमिका तर मिळाली पाहिजे. माझ्यासाठी कोणतीही भूमिका नसून जर मला दीर्घकाळ कोणतीही भूमिका ऑफर केली नाही, तर मी या क्षेत्रात कसा टिकू शकेल.”
हे देखील वाचा – मराठी, हिंदी सिनेसृष्टीनंतर वनिता खरातची दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये एन्ट्री?, साऊथ इंडियन लूक पाहून रंगली चर्चा
“मला कामाबद्दल दररोज माहिती मिळत असते. माझी एक टीम आहे, जी माझ्यासाठी स्क्रिप्ट देखील आणत राहते. मी काही लोकांकडे जेव्हा ऑडिशनसाठी जातो, तेव्हा मी पाहतो की अलीकडच्या काळात या सृष्टीत बरेच बदल झालेत. वेळ बदलली असून आता अधिक शांत राहण्याची मला गरज आहे. कोरोनानंतर सर्व काही विस्कळीत झाले आहे. त्यामुळे लोकांचा कामाकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलला आहे. मी लोकांना आणि चित्रपट निर्मात्यांना फोन करून किंवा ईमेल करून सांगतो, की मी काम शोधत आहे, मला कास्ट करा. पण जर मला भविष्यात चांगली भूमिका मिळाली तर मी ती जाऊ देणार नाही.”