झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत काही दिवसांपूर्वी चारुलताची एन्ट्री झाली आहे. चारुलताच्या एन्ट्रीनंतर मालिकेला एक नवीन वळण आलं आहे. मालिकेत सध्या अक्षराला वेडी ठरवण्यात आलेले असून तिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं आहे. चारुलताच्या रुपात घरी आलेली बाई दुसरी तिसरी कोणीही नसून भुवनेश्वरी असल्याची खात्री अक्षराला होते आणि सासूचं खरं रुप ती सर्वांसमोर आणते. मात्र, सूर्यवंशी कुटुंबीयांसमोर अक्षराला खोटं सिद्ध करायचं असा प्लॅन आधीच भुवनेश्वरीने आखलेला असतो. (Tula Shikvin Changlach Dhada Charuhas Marriage)
एकीकडे अक्षरा रुग्णालयात असताना दुसरीकडे, घरात भुवनेश्वरी आणि चारुहासच्या लग्नाचा घाट घालण्यात येतो. सुनेच्या अनुपस्थितीत लग्न व्हावं अशी चारुहासची अजिबात इच्छा नसते. पण, चारुलता (भुवनेश्वरी) त्याचं मतपरिवर्तन करण्यात यशस्वी होते. त्यामुळे आता मालिकेत चारुहास व चारुलता यांचे लग्न पाहायला मिळणार आहे. या लग्नाचे काही प्रोमो व व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. याच लग्नानिमित्त इट्स मज्जाने मालिकेतील चारुहास म्हणजेच अभिनेते स्वप्नील राजशेखर यांच्याशी खास संवाद साधला.
यावेळी स्वप्नील राजशेखर यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील लग्नाविषयी भाष्य केलं आहे. स्वप्नील यांना त्यांच्या लग्नाची अविस्मरणीय आठवण विचारण्यात आली. तेव्हा ही आठवण सांगताना त्यांनी असं म्हटलं की, “माझं लग्न खूप मजेशीर होतं. वयाच्या २१ व्या वर्षी माझं लग्न झालं. तेव्हा मी लहान होतो. म्हणजे माझा हा जवळजवळ बालविवाहच आहे आणि ते लग्न आम्ही पळून जाऊन केलं होतं. नरसोबाच्या वाडीला आम्ही लग्न केलं होतं. या लग्नाला माझे आई-वडील, माझे भाऊ, काका आणि असं एकूण ५० जणांचं संपूर्ण कुटुंब होतं. पण सासरवाडीचे कुणीच नव्हतं”.
यापुढे ते असं म्हणाले की, “त्यामुळे ते पळून जाऊन केलेलं लग्न होतं. त्यामुळे लग्नाच्या २५ वर्षांनी जेव्हा मी माझं लग्न री-क्रिएट केलं तेव्हा लग्नाच्या फोटोच्या कॅप्शनमध्ये मी म्हटलं की पहिल्यांदा लग्नाला माझे सासरचे मंडळीही उपस्थित होते”. अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारणारे अभिनेते स्वप्नील राजशेखर सध्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पाहायला मिळत आहेत. ‘झी मराठी’ वाहिनीवरील या मालिकेत स्वप्नील राजशेखर यांनी चारुहास ही भूमिका साकारली आहे. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.