‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण आलेली पाहायला मिळत आहेत. मालिकेत अक्षराने भुवनेश्वरीची बाजू घेत तिच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. मात्र इतकं करुनही भुवनेश्वरीच्या मनात अक्षराबद्दल असलेला राग कायम आहे. तर एकीकडे अक्षराने भुवनेश्वरी व चारुहास यांच्यातील वादही मिटवला आहे. दोघेही एकमेकांच्या कलाने घेताना दिसत आहेत. अशातच मालिकेच्या समोर आलेल्या एका प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. (Tula shikvin changlach dhada Promo)
मालिकेच्या समोर आलेल्या या प्रोमोमध्ये अधिपतीला गाणं गायचं असतं. मात्र गाणं गाण्याची परवानगी अधिपतीला नसते. त्यामुळे भुवनेश्वरीकडून अधिपतीला त्याची आवड जोपासता यावी म्हणून गाणं गाण्यासाठी परवानगी घ्यायला अक्षरा व चारुहास जातात. चारुहास भुवनेश्वरीला म्हणतात, “अधिपतीच्या गळ्यात गाणं आहे, सूर आहे. आणि मी ते ऐकलं आहे. त्यामुळे त्याने गाणं शिकावं अशी माझी इच्छा आहे”, असं म्हणतात. यावर भुवनेश्वरी म्हणतात, “हा माझ्या लक्षात येतंय तुमच्या दोघांचं म्हणणं काय आहे ते. आम्ही विचार करतो”, असं ती म्हणते.
यावर चारुहास म्हणतात, “हरकत नाही. तू विचार कर, वेळ घे पण चांगला विचार कर. आणि अधिपतीच्या इच्छेचाही विचार कर”, असं सांगून तेथून निघून जातात. एकीकडे अक्षराच्या बाबांची तब्येत ठीक नसते, त्यामुळे ती माहेरी जाते. त्यावेळी अधिपतीला गाणं शिकवण्यासाठी गाण्याच्या शिक्षिका घरी येतात. भुवनेश्वरी या तिथेच बसलेल्या असतात. त्यांना पाहून त्या विचारतात, आपण कोण?, यावर त्या शिक्षिका म्हणतात, “मी इथे गाणं शिकवायला आले आहे”. यावर भुवनेश्वरी “इथं कोणाला गाणं शिकायचं नाही”, असं म्हणून त्या शिक्षिकेला परतवून लावतात.
आता मालिकेच्या आगामी भागात अक्षरा व चारुहास अधिपतीची गाण्याची आवड जोपासण्यासाठी काय प्रयत्न करणार?, भुवनेश्वरी अधिपतीला गाणं गाण्याची परवानगी देणार का?, हे सर्व मालिकेत पाहणं रंजक ठरणार आहे.