नाटक, मालिका व चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून शिवानी रांगोळेला ओळखलं जातं. सध्या ती ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अक्षरा हे पात्र साकारत आहे. मालिकेत सध्या अक्षरा-अधिपतीची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. प्रेमाची कबुली दिल्यावर त्यांचं नातं अधिक फुलताना दिसत आहे. अक्षरा व अधिपती यांच्या खऱ्या संसाराला आता कुठे सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रेक्षक अधिकच मालिकेच्या प्रेमात पडत आहेत.
आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तसेच शूटिंग असो किंवा वैयक्तिक आयुष्य शिवानी रांगोळे प्रत्येक अपडेट चाहत्यांबरोबर शेअर करत असते. शिवानी ही मृणाल कुलकर्णी यांची सून असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे घरात साहजिकच याबद्दल चर्चा होत असावी. त्यामुळे मालिकेबद्दल शिवानीच्या सासू मृणाल कुलकर्णी व घरच्यांची काय प्रतिक्रिया असते. याबद्दल तिने सांगितले आहे.
‘इट्स मज्जा’बरोबर मारलेल्या खास गप्पांमध्ये शिवानीने मालिकेबद्दल तिच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया असते. याबद्दल सांगितले आहे. यावेळी तिने असं म्हटलं की, “माझ्या फक्त सासूबाईच नाही तर दोन्ही आजेसासूबाईदेखील बसून ही मालिका बघतात. मध्यंतरी एका भागामध्ये मी सतत रडत होते. भुवनेश्वरी मला सतत काहीतरी बोलत होत्या. त्यामुळे मी रडत होते. तर यावर त्यांना खूप वाईट वाटलं होतं. तेव्हा त्या आमच्या सूनेला किती बोलतात किती रडवतात असं म्हणाल्या होत्या. ते बघून मला खूपच भरून आलं होतं”.
आणखी वाचा – ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वात जुने स्पर्धक सहभागी होणार?, कलाकारांच्या पोस्टमुळे चर्चा, उत्सुकता शिगेला
यापुढे तिने असं म्हटलं की, “ रात्री आठ वाजता आमच्या घरी ही मालिका बघण्याचा ठरलेला कार्यक्रम असतो. फक्त मालिका बघतातच असं नाही, तर त्यावर आनंदाने काय आवडलं? काय नाही? याबद्दल प्रतिक्रियाही देतात. मालिकांबद्दलच्या प्रतिक्रिया देण्यात खूप आपुकीने सहभागी होतात. माझे कुटुंब या क्षेत्रातील असूनही ते खूप सहभागी होतात”.
यापुढे शिवानीने आपल्या सासूबाईबद्दल असं म्हटलं की, “मी अनेकदा असं म्हटलं आहे की, माझ्या सासूबाई या क्षेत्रात माझ्यासाठी वरिष्ठ असून मला त्या नेहमीच कामाबद्दल काहीना काही सूचना देत असतात. तसं घरी आम्ही ठरवून चर्चा करत नाही आणि खरं सांगायचं झालं तर आम्ही कामाविषयी बोलणं होत नाही. पण ती काय योग्य आहे? काय नाही?, काय केलं पाहिजे? काय नको करु? याबद्दल आवर्जून सांगत असते”.