मराठी नाटक, मालिका व चित्रपटांमधुन प्रेक्षकांच्या भेटीला येणारे अभिनेते म्हणजे अतुल तोडणकर. ‘पिंजरा’ व ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकांमुळे अतुल तोडणकर घराघरांत लोकप्रिय झाले. ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतील त्यांनी साकारलेल्या विनायक काका म्हणजेच ‘कुक्की’ या पात्राला तर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. मालिकेतील कुक्की आजहे प्रेक्षकांच्या लक्षात आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आणि त्यानंतर अतुल तोडणकर फार कुठे दिसले नाहीत आणि याचे कारण म्हणजे त्यांचं आजारपण. अतुल यांच्या आजारपणाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे ती म्हणजे अतुल यांना ब्रेन हॅमरेज झाला होता. (Atul Todankar Brain Hemorrhage)
अतुल यांच्या या आजारपणाबद्दल त्यांनी स्वत: एका पोस्टद्वारे सांगितले आहे. इन्स्टाग्रामवर अतुल यांनी एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, “ही पोस्ट शेअर करण्यामागे खास कारण आहे. बरेचदा आपल्या आजारपणाची योग्य आणि उत्तम ट्रीटमेंट कुठे मिळेल हे माहित नसतं आणि एकदा का वेळ निघून गेली की आपल्या हाती काहीही उरत नाही, म्हणून हा पोस्ट प्रपंच. माझे दोन वाढदिवस आहेत. एक जन्मदिवस आणि दुसरा पुनर्जन्म दिवस. नाटक, मालिका, चित्रपट या तीनही क्षेत्रात उत्तम काम चालू होतं आणि अचानक २१ जानेवारी २०२४ ला ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाच्या पुण्याच्या प्रयोगादरम्यान मला शारीरिक अस्वासाथ्याला सामोरं जावं लागलं, ब्रेन हॅमरेज झालं”.
यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “सगळं थांबलं आणि जवळपास सगळं संपल्याची जाणीव झाली. परमेश्वराची कृपा, आईवडील, बायको, मुलगा, सर्व रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे आणि योग्य वेळेत मिळालेल्या उपचारामुळे यातून ठणठणीत बरा झालो. पण त्याकरता ६-७ महिने पूर्ण आराम आणि उपचार घ्यावे लागले आणि सर्वात महत्वाचे सर्वोत्तम उपचार मिळाले. आमच्या चंदेरी दुनियेत काम करताना अवेळी जेवण, कामाच्या मोकाट वेळा, अपुरी झोप व आराम यामुळे तुमची शरीर प्रकृती आतून पोखरत जाते आणि असा अचानक विस्फोट होतो जो दुर्दैवाने माझ्या बाबतीत झाला”.
यापुढे त्यांनी तब्येतीविषयी असं म्हटलं की, “आम्ही सगळेच कलावंत आपापली काळजी घेत असतोच. जिम, योगा, मेडिटेशन, स्किन आणि केसांची काळजी घेत असतोच पण अंतर्गत शरीर स्वच्छता करायचं विसरतो. मी ७ दिवसात माझ्या शरीराची अंतर्गत स्वच्छता करून आलो आणि माझी प्रकृती कमालीची सुधारलीय. वर्षातून किमान ७ दिवस तरी स्वतःच्या तब्येतीसाठी द्यायचेच आणि आपली शरीररुपी गाडी सर्विस करून घ्यायची, हे ठरलंय. माझ्या सर्व स्नेही, कलाकार मित्रमंडळी या सर्वांना मला आवाहन करावेसे वाटते की वर्षातून एकदा आपल्या तब्येतीसाठी, एक पिकनिक स्वतःच्या प्रकृतीसाठी करा”. दरम्यान, या पोस्टमध्ये अतुल यांनी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानले आहेत. 15 September Horoscope : कन्या व वृषभ राशीच्या लोकांसाठी रविवारचा दिवस अनुकूल आहे, कुणाच्या नशिबात नेमकं काय?, जाणून घ्या…