लग्न म्हटलं की उखाणा हा या लग्नातील महत्त्वाचा आकर्षण बिंदु असतो. नवरा-नवरी उखाण्यातून आपापल्या जोडीदाराचे नाव कसे घेतात याकडे वऱ्हाडीमंडळींचे लक्ष लागून राहिलेले असते. अशातच मराठी मनोरंजन सृष्टीत सध्या लगीनघाई सुरु आहे. छोट्या पडद्यावरील कलाकार मंडळी आपल्या जोडीदाराबरोबर विवाहबंधनात अडकत आहेत. नुकतीच छोट्या पडद्यावरील वृंदा व राणा म्हणजेच अभिनेता शुभंक्र एकबोटे व अमृता बने ही जोडी विवाह बंधनात अडकली.
अमृता-शुभंकर यांच्या पाठोपाठ छोट्या पडदयावरील आणखी एक जोडी विवाहबंधनात अडकली, ही जोडी म्हणजे अभिनेता चेतन वडनेरे व अभिनेत्री ऋजुता धारप. चेतन वडनेरेने गर्लफ्रेंड ऋजूता धारपबरोबर विवाहगाठ बांधली आहे. चेतन-ऋतुजा काही वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते आणि अखेर दोघांनी काल म्हणजेच २२ एप्रिल २०२४ रोजी एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून कलाकारांसह त्यांच्या अनेक चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.
अशातच त्यांच्या उखाण्याचा एक व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. चेतनने आपल्या खास शैलीत उखाण्याद्वारे आपल्या बायकोचे नाव घेतले आहे. यावेळी त्याने उखाणा घेत असं म्हटलं की, “ठाण्याचे असतील तलाव फेमस, पण नाशिकची आमची नदीच, ऋजुताचं नाव घेतो, आमचं ठरलं होतं आधीच”. त्याच्या या व्हिडीओवर उपस्थितांनी टाळ्या वाजवत चांगलाच प्रतिसाद दिला.
चेतनचा हा उखाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी कमेंट्समध्ये हा उखाणा आवडला असल्याच्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. चेतन-ऋजुता यांच्या लग्नातील पारंपरिक लूकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
दरम्यान, चेतन-ऋजूता या दोघांनी ‘फुलपाखरु’ मालिकेत अभिनय केला होता. ‘फुलपाखरु’ मालिकेच्या सेटवरच दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. यानंतर चेतन-ऋजूता यांनी काही वर्षापुर्वी त्यांच्या नात्याचा जाहीर खुलासा केला. काही महिन्यांपुर्वी साखरपुडा करुन दोघांनी अखेर काल एकमेकांबरोबर सात फेरे घेत लग्नगाठ बांधली.